“आनंद म्हणजे काय?” मराठी बाल कथा

 


फोटो : गुगल सौजन्य 




“आनंद म्हणजे काय?”


“आई आई, आनंद म्हणजे काय गं..?” छोटी मिताली शाळेतून पळत पळत येऊन आईला मिठी मारत म्हणाली. 


आजी म्हणते, “छोट्या छोटया गोष्टीतही आनंद असतो, फक्त तो शोधावा लागतो.” 


“कसा गं शोधायचा तो..?”


तू नेहमी म्हणतेस, “आनंद देता यावा आणि आनंद घेताही यावा.” 


“म्हणजे काय गं आई ?”


आमच्या टीचर म्हणतात, “प्रत्येक गोष्टीत आनंद मानावा म्हणजे निराशा येत नाही.” 


“आता ही निराशा कोण?”


आणि आबा (आजोबा) रोज सकाळी त्या गाडी पुसणाऱ्या दादाला वेगळंच विचारत असतात, “अरे आनंद, गाडी पुसली का रे स्वछ.” 


काल आमच्या मराठीच्या बाईंनी कविता वाचून दाखवली.. 


“आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे..”


मला तर काहीच कळत नाही, नुसता गोंधळ उडालाय डोक्यात. 


“अगं मिताली, आधी शांत हो बरं आणि पटकन हात पाय धुवून ये” असं आई म्हणाली अन तोंडाचा चंबू करून मिताली हात पाय धुवायला गेली. 


हात पाय धुतल्यावर, “बस बघू इथे, असं निराश नाही व्हायचं” असं म्हणत आईने मितालीला सोफ्यावर बसवलं. 


तेव्हा मिताली आईला म्हणाली, “आधी सांग बरं हा आनंद कोण आहे? त्याला कुठे आणि कसे शोधायचे?”


“हो हो सांगते” असं म्हणत आईने तिच्या हातात लाडूची वाटी ठेवली. 


लाडू पाहून मिताली एकदम खुश झाली. “लाडूsss!” असं मोठ्याने ओरडत.. “आई, लाडू कधी केलेस, मला खुप आवडतात लाडू” असे म्हणत पटापट लाडू संपवला देखील.


आई मितालीच्या चेहऱ्याकडे बघून गालातल्या गालात हसत अगदी निरखून पहात होती. 


मितालीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आईला वेगळेच समाधान मिळत होते. 


ते पाहून मिताली म्हणाली, “आई, अशी बघतेस काय गं माझ्याकडे.” 


आई म्हणाली, “तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतेय, तो पाहून मला देखील खुप आनंद झालाय बरं.” 


“आई, मला लाडू आवडतो हे तुला माहीत होते म्हणूनच तू लाडू बनवलेस ना..!”


“हो गं राणी..” मितालीचे नाक पकडत आई म्हणाली, “तुझा आनंद तोच माझा आनंद, तुझ्या चेहऱ्यावरचा हाच आनंद मला पहायचा होता बरं!” 


“अच्छा..  म्हणजे आई, एखादी गोष्ट आपल्याला अचानक मिळाली की जी ख़ुशी होते तो म्हणजे आनंद. हो ना..!” 


“अगदी बरोबर.” मितालीच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली. 


“आजी म्हणते, छोट्या छोटया गोष्टीतही आनंद असतो फक्त तो शोधावा लागतो.” आता समजलं कसा शोधायचा तो ते. 


“तू नेहमी म्हणतेस, आनंद देता यावा आणि आनंद घेताही यावा.” 


"मला झालेला आनंद पाहून तू देखील खुश झालीस.."


म्हणजे आपण दुसऱ्याला आनंद दिला की आपल्यालाही आनंद मिळतो, हो ना..! 


हो, अगदी खरं. 


तेवढ्यात आजीने आवाज दिला, “अगं मिताली ये गं इकडे, तुझ्या आबांनी बघ काय बनवलंय.”


मिताली पळतच आजी-आबांच्या रूममध्ये गेली. पहाते तर काय! आबांनी चक्क कागदाची होडी बनवली होती. 


ते पाहून मितालीने खुश होत आबांना मिठी मारली. 


बाहेर पाऊस पडत होता आणि बागेतील नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ बरेच पाणी साचले होते. आबा मितालीला घेऊन नारळाच्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी ती नाव झाडाच्या बुंध्यातील पाण्यात सोडली. 


पाण्यावर हेलकावे घेत ती नाव तरंगताना पाहून मिताली खुश होऊन आनंदाने टाळ्या वाजवू लागली. 


मितालीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आजी-आबा ही खुश झाले. दुरून हे सर्व पाहणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळीच ख़ुशी होती. 


तेवढ्यात गाडी पुसणाऱ्या दादाला सायकलवरून जाताना पाहून आबांनी आवाज देत विचारले, “अरे काय रे आनंद, झाली का ऍडमिशन, तुला हवे ते कॉलेज मिळाले ना..?” 


“नाही काका, हवे ते कॉलेज नाही मिळाले पण जे मिळाले तेही खुप चांगले आहे.” असे म्हणत दादा निघून गेला. 


हा संवाद ऐकून मिताली आईजवळ गेली अन म्हणाली, आई आमच्या टीचर म्हणतात, “प्रत्येक गोष्टीत आनंद मानावा म्हणजे निराशा येत नाही.” याचा अर्थ मला आत्ता समजला. 


“दादाला पाहिजे ते कॉलेज मिळाले नाही तरी तो खुश आहे.” 


“ दादाचे नांवच आनंद आहे म्हणून आबा त्याला आनंद म्हणतात आणि मगाशी मी तुला प्रश्न विचारले पण तू मला हातपाय धुवायला सांगितलेस तेव्हा मला खुप वाईट वाटलं ती म्हणजे निराशा.”


“हो ना..!”


हे ऐकूण आजी, आबा, आई सगळेच आनंदाने हसू लागले अन मिताली बाईंनी शिकवलेले गाणे मोठमोठ्याने गाऊ लागली.. 


“आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे “ 

“आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे “ 



धन्यवाद..! 🙏🏻

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर.. ✍🏻



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या