"आणि जीव भांड्यात पडला" मराठी लघुकथा

 




"आणि जीव भांड्यात पडला" 


आकाश काळ्या ढगांनी भरले होते, विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडात चालू होता, पाऊस धो-धो कोसळत होता. संध्याकाळचे सात वाजले होते, माधवराव दिवाणखान्यात येरझाऱ्या घालत होते. काय करावे त्यांना काही सुचत नव्हते.


"फोन करावा का?"


"नाही, नकोच. हिने बजावून सांगितलंय कि वसूची सुटका झाली की कळवेन मी, काळजी करू नका."


मग स्वतःशीच पुटपुटले, "येईल तिचाच फोन."


त्यांना स्वतःलाही जायचे होते परंतु रमाने त्यांना घरी कुणीतरी असायला हवे म्हणून थांबवले होते.


आता संध्याकाळचे आठ वाजायला आले होते, माधवराव काळजीने अगदी हैराण झाले होते, इतक्यात सखू आली. सायबांना अशा अवस्थेत बघून तिलाही अंदाज आला.


 ती म्हणाली, "ताईसाहेबांना नेलं का हास्पिटलात"?


"तुला कसं कळलं"? माधवराव म्हणाले.


"आवं त्यात काय एवढं न कळायला, मी पण एक बाई हाय आन तीन पोरांची आई पण हाय"


"कालपासून ताईसाहेबांचा चेहरा पाक उतरला व्हता, तवाच यळ जवळ आलीय असं वाटलं व्हतं मला."


"बाईसाहेब आणि ताईसाहेब कुटबी दिसत न्हाईत अन तुम्हीबी जीवाला घोर लावून येरझाऱ्या घालताय, तवाच वळखलं."


मधवरावांचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.


"साहेब, काय बी काळजी करू नका, ताईसाहेब पहिलटकरीन असल्या तरी सुखरूप सूटत्याल".


"तसं झालं तर चांगलंच आहे पण हिचा अजून फोन कसा येत नाही?"


असे म्हणत मधवरावांचे चकरा मारणे चालूच होते. नऊ वाजत आले, सखूचा स्वयंपाकही होत आला होता, सखुला मधवरावांची काळजी कळत होती.


"बापाचं काळीज हाय, घोर लागणारच जीवाला", ती स्वतःशीच पुटपुटली. 


आजही माधवरावांना तो दिवस लख्ख डोळ्यासमोर दिसत होता. पंचवीसवर्षांपूर्वीही असाच पाऊस कोसळत होता, संध्याकाळची वेळ होती आणि अचानक रमाबाईंना कळा सुरु झाल्या. त्यावेळी ते एका खेड्यातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून काही माहिन्यांपूर्वीच रुजू झाले होते.


त्या खेड्यात हॉस्पिटल नव्हते, त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागत असे. अशा भर पावसात रमाला हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. हे पाहून त्यांच्या घर मालकिणीने गावातील सुईनीला बोलावणे धाडले.


माधवरावांना काही सुचत नव्हते. थोड्याच वेळात सुईण आली तिने रमाबाईंना बघितले आणि सांगितले,


"बाळ आडवं आलं हाय, हिला हास्पिटलात घेऊन जायला हवं, नायतर हिच्या अन बाळाच्या दोघांच्याबी जीवाला धोका हाय."


हे ऐकून माधवरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते मटकन खाली बसले.


इतक्यात त्यांच्या घराशेजारी एक ट्रक आल्याचा आवाज ऐकू आला. माधवराव पळतच बाहेर आले. या ट्रक मधून गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील माल (तरकारी) शहरात नेला जात असे. माधवरावांनी आणि त्यांच्या घरमालकिनीने त्या ट्रक ड्रायव्हरला सगळी हकीकत सांगितली. त्याने लगेचच सांगितले,


"काय बी काळजी करू नका सर, माझ्या ट्रक मधून तुम्हाला मी हॉस्पिटलला पोहोचवतो"


असे सांगून रमाबाई आणि माधवरावांना घेऊन तो शहराकडे रवाना झाला. धो-धो पडणारा पाऊस आणि समोर मिट्ट काळोख अशात ट्रक चालवणेदेखील अवघड झाले होते. इकडे रमाबाईंची हालत खूप वाईट होत चालली होती. हे पाहून मधवरावांचाही धीर सुटत चालला होता.


ते पंधरा वीस किलोमीटरचे अंतरही त्यांना कित्येक मैलांचे वाटत होते. पाऊण तासात हॉस्पिटल आले, रमाबाईंना आत नेले. परिस्थिती अगदी नाजूक आणि अवघड होती. माधवराव देवाचा धावा करू लागले. ट्रक ड्रायव्हर त्यांच्या बरोबरच होता.


तो म्हणाला, "काय बी काळजी करू नका सर, सगळं काही ठीक हुईल."


इतक्यात नर्स बाहेर आली आणि तिने रमाबाईंना मुलगी झाल्याची खबर दिली व दोघीही सुखरूप असल्याचे सांगितले. हे ऐकून माधवरावांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले आणि ट्रक ड्रायव्हरलाही धन्यवाद दिले कारण आज तो नसता तर काय झाले असते याची कल्पनाही ते करू शकत नव्हते.


आजही त्यांना तो दिवस लख्ख डोळ्यासमोर दिसत होता आणि म्हणूनच ते अधीकच भांभावले होते. 


इतक्यात फोन वाजला आणि फोनच्या आवाजाने माधवराव भानावर आले. माधवरावांनी पळत जाऊनच फोन उचलला,


"काय गं, किती वेळ फोन करायला? इकडे माझा जीव जायची वेळ आली होती वाट बघून, कशी आहे वसू ? आणि बाळ कसे आहे?"


"अहो, होहो.. ! किती प्रश्न विचाराल एका वेळी... !"


"तुम्ही आजोबा झालात! वसूला मुलगी झाली."


रमाबाई पुढे म्हणाल्या, "वसू आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, अगदी गोड आहे हो मुलगी, अगदी आपल्या वसू सारखीच."


हे ऐकून माधवरावांचा जीव भांड्यात पडला, त्यांचे डोळे आनंदाने भरून वाहू लागले. देवाचे आभार मानत त्यांनी फोन ठेवून दिला आणि देवापुढे पहिली साखर ठेवून नमस्कार केला.


त्यांना खूप आनंद झाला होता, त्यांची चिमुरडी आज आई झाली हाती. जीची इवली इवली पावले या घरात दुडदुडली आज तिच एका पिल्लाची आई बनली होती.


 ©सुचिता वाडेकर... ✍🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या