Besan Ladoo Recipe in Marathi - बेसन लाडू #दिवाळी_फराळ रेसिपी




Besan Ladoo Recipe in Marathi - बेसन लाडू  #दिवाळी_फराळ रेसिपी 


 बेसन लाडू

#दिवाळी_फराळ


#बेसन_लाडू


बेसन लाडू बनवताना शक्यतो शुद्ध तुपाचा वापर करावा. शुद्ध तुपामुळे लाडू चविष्ठ बनतात शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे तूप खाणे हितकारक आहे. मशीनच्या पार्ट्सना जशी वंगणाची गरज असते तशी शरीराच्या सांध्यांनाही वंगणाची गरज असते आणि या शरीराच्या वंगणाची कामगिरी हे शुद्ध तूप करते. कोणतीही गोष्ट अति खाणे हे आरोग्यासाठी वाईटच असते परंतु ती जर प्रमाणात खाल्ली तर मात्र ते औषध बनते.  आयुर्वेदामध्ये शुद्ध तुपाला खूप महत्व आहे.


पाहुयात आपण शुद्ध तुपातील Besan Ladoo. 


 साहित्य :


 • बेसन पीठ दोन वाट्या

 • पिठी साखर एक वाटी

 • तूप एक वाटी

 • पाच ते सहा बदामाचे काप

 • पाच ते सहा काजूचे काप

 • दूध २ चमचे 


कृती : 


१. बेसन पीठ चाळणीतून चाळून घ्यावे.


२. गॅसवर कढईमध्ये तूप घालून चाळलेले बेसन पीठ घालून मंद आचेवर भाजून घ्यावे.


३. बेसनपीठ भाजण्यासाठी साधारणतः १५  ते २० मिनिटे लागतात त्यानंतर तूप सुटू लागते व बेसन पीठ हलके होऊ लागते.


४. यानंतर यात बदामाचे काप घालावेत व  दहा मिनिटे सतत हलवत राहावे.


५. तूप चांगले सुटले आणि बेसन पिठाचा एक सुगंध दरवळू लागला की गॅस बंद करावा.


६. यानंतर या बेसन पिठाला दोन चमचे दुधाचा हबका मारावा आणि बेसन पीठ नीट हलवुन घ्यावे व थंड होऊ द्यावे.


७. बेसन पीठ थंड झाले कि त्यात पिठी साखर मिक्स करावी व तयार मिश्रणाचे लाडू वळावेत. सजावटीसाठी काजूचे काप लावावेत.


• आपले बेसन लाडू तैयार !




टीप :


१. बेसन पिठ मंद आचेवर भाजावे व सतत हलवत राहावे अन्यथा खाली लागू शकते.


२. दुधाचा हबका मारल्यामुळे बेसन फुलते आणि लाडू खूप छान होतात. चार वाटी बेसन पीठ घेतले तर चार चमचे दूध वापरावे.


३. पाऊण वाटी साखर मिक्सरला फिरवल्यावर एक वाटी पिठीसाखर तयार होते.


४. बेसन लाडू साठी पीठ थोडे रवाळ दळून आणावे आणि विकतचे किंवा नेहमीचे बेसन पीठ घेतले तर त्यात दोन चमचे रवा टाकावा म्हणजे लाडू टाळूला चिकटत नाही.


५. दोन वाटी बेसन पिठामध्ये साधारणतः अकरा ते बारा लाडू तयार होतात.


©सौ. सुचिता वाडेकर... ✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या