Maher : "माहेरपण" घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात हे बोल ऐकले तरी प्रत्येक स्त्रीचं मन माहेरी फेर फटका मारून येतं

"माहेरपण"

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२३ मार्च २०१८










       माहेरपण म्हणजे नक्की काय असतं हे माहेरी जाऊनच अनुभवावं किंवा हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी वर्षातून एकदा तरी माहेरी नक्की जावं. पूर्वी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी माझ्या आईची माहेरची ओढ आणि भावाविषयीच तिचं प्रेम पाहून वाटायचं की किती..... कौतुक ते.... एवढं काय त्यात.... पण आता कळतात आईच्या भावना... कितीही सासरी सुखी असलो, आनंदात असलो तरी माहेरची ओढ ही असतेच प्रत्येकीच्या मनात...



"घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात"

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात ! ॥धृ.॥

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं ! ॥१॥

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं. ॥२॥

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो. ॥३॥

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार ! ॥४॥

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ? ॥५॥

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !" ॥६॥

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला ! ॥७॥

गीत : कृ. ब. निकुंब
संगीत : कमलाकर भागवत
स्वर : सुमन कल्याणपूर

       हे बोल ऐकले तरी प्रत्येक स्त्रीचं मन माहेरी फेर फटका मारून येतं आणि वर्षातून एकदा तरी निवांत दोन दिवसंसाठी का होईना माहेरी जाण्याची ओढ लागते.


       याबाबतीत मी खूप सुदैवी आहे कारण मला दोन माहेर आहेत. एक म्हणजे माझी आई बारामतीला माझ्या धाकट्या भावाकडे असते त्यामुळे 'बारामती' हे माझे माहेर आणि दुसरे म्हणजे माझी काकू जी आमच्यावर आईवत प्रेम करते.. जीला आम्ही भावंड आईच म्हणतो.... आणि जिने मला अकरावी बारावी दोन वर्षे तिच्या प्रतिकूल परिस्थितीतही सांभाळलं ती माझी काकू साताऱ्यात असते त्यामुळे 'सातारा' हे माझे दुसरे माहेर. वर्षातून एकदा तरी दोन दिवस का होईना दोन्हीकडे माझे जाणे होते. 

       काल ही असेच काकूला भेटण्यासाठी साताऱ्याला जाणे झाले, खरे तर संध्याकाळी परत येणार होते पण पाय निघाला नाही आणि एक दिवस राहिले. या माहेरपणाची सुरुवात आम्ही येणार आहोत या क्षणापासून सुरु होते... वाटेत असतानाच वाहिनीचा कुठवर आलात असा आपुलकीचा फोन .... स्टँडवर उतरल्यावर घरी घेऊन जाण्यासाठी भाऊराया गाडी घेऊन हजर.... घरी गेल्यावर होणारं स्वागत.... 

       भावांची प्रेमळ मुलं... सर्वांचे खुललेले चेहरे....  जेवणाचा मेनू माझ्या अन माझ्या लेकीच्या आवडीचा.... माझ्या लेकीला आवडणाऱ्या गोष्टी देण्यासाठी तत्पर असलेला तिचा मामा... आणि तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहून आकाश ठेंगण झालेलं माझं मन.... किती अन किती वर्णन करू याचं... म्हणून म्हणते प्रत्येक स्त्रीने वर्षातून एकदा तरी हे माहेरपण(हा आनंद सोहळा) अनुभवण्यासाठी दोन दिवस का होईना माहेरी जावं. 

       काल माझ्या दोघी वहिनींनी आम्ही (माझी मोठी बहीण, मी आणि माझी मुलगी) येणार म्हणून आमच्या आवडीचा मेनू बनवला होता. भरलं मसाला वांग, मेथीची भाजी, मसाले भात आम्रखंड..... माझ्या लेकीला आवडतं म्हणून मामाने आणलेलं मँगो आईस्क्रीम.... खास माझ्या लेकीला आवडते म्हणून संध्याकाळी बनवलेली पावभाजी (माझ्या बहिणीने बनवली).... 

       दुसऱ्या दिवशी  सकाळचा नाष्टा साजूक तुपातील शिरा माझ्या लेकीच्या आवडीचा... आणि दुपारचं जेवण करून परतीचा प्रवास... मोठ्या भावाचा मुलगा अनिकेत सोबत त्याच्या कार मधून...जो Architect आहे.... येता येता अचानकच ग्रामदैवत 'पद्मावतीदेवी'(ओझर्डे जिथे मी लहानाची मोठी झाले) चे दर्शन (सहा वर्षांनी घेतले) अनुमुळे.

       एवढा सगळा पाहुणचार घेऊन तृप्त मनाने पुढील वर्षभरासाठीची एनर्जी घेऊन दुपारी आम्ही परत घरी यायला निघालो.... 

सोबत माझ्या वहिनींनी बनवलेल्या डिशेसचे काही फोटो... 

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

•  Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 
©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर
पुणे.
२३ मार्च २०१८ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या