'सोफोश' अनाथांचे माहेरघर
© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर…✍🏻️
पुणे.
फोटो : गुगल सौजन्य |
'सोफोश' म्हणजे 'सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ दी ससून'. 'जिथे कमी तिथे आम्ही' हे सोफोशचे ब्रिदवाक्य. ससून रुग्णालयात पेशन्टसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा, सोयी पुरवण्यासाठी सोफोश हि संस्था कार्य करते.
ससून रुग्णालयात येणाऱ्या अनेक निराधार बालकांचे तसेच समजतील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या निराधार, विकलांग बालकांचे संगोपन आणि पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सोफोशने उचललेले पहिले पाऊल म्हणजे सोफोश चे 'श्रीवत्स'.
फोटो : गुगल सौजन्य |
'डिप्लोमा इन कौन्सेलिंग सायकोलॉजी' याचा अभ्यास करत असताना सोफोश या संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी सोफोशच्या 'श्रीवत्स' मध्ये जाण्याचा योग आला.
पुणे रेल्वेस्टेशन जवळ असलेल्या ससून या सरकारी रुग्णालयाच्या आवारात सोफोश हया सेवाभावीसंस्थेचे कार्यालय आहे आणि त्या समोरच बालविकास संगोपन आणि पुनर्वसन या 'श्रीवत्स' नावाने कार्यरत असलेल्या सोफोशच्या संस्थेचे कार्यालय आहे.
दुपारी दोन वाजता आम्ही तिथे पोहोचलो, सर्वजण आल्यावर आम्ही सोफोशच्या रजिस्टर मध्ये एन्ट्री करून आमच्या चपला तिथेच काढून तेथील स्लिपर्स घालून दुसऱ्या मजल्यावरील एका हॉलमध्ये बसलो. थोड्याचवेळात 'श्रीवत्स' च्या प्रशासकीय अधिकारी दीपाली सय्यद आल्या आणि 'सोफोश' आणि 'श्रीवत्स' चे कार्य कसे चालते यावर विस्तृत माहिती दिली.
अनेकांना पडलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आणि शेवटी या संस्थेचे कार्य कसे चालते हे प्रत्यक्ष आम्हाला नेऊन दाखवले. तेथील जन्मापासून ते 3 महिन्या पर्यंतच्या बाळाचा कक्ष, 3 ते 1 वर्षापर्यंतच्या बाळाचा कक्ष, 1ते त्यापुढील बाळाचा कक्ष, स्वच्छ स्वच्छतागृह, तसेच मुलांची क्लासरूम, त्यांचे फोटो, संस्थेत होणारे विविध कार्यक्रमांचे फोटो, मान्यवरांनी दिलेल्या व्हिजिटचे फोटो आदी सर्व स्वतः दाखवले.
सोफोश आणि श्रीवत्स च्या कार्याच्या माहितीचा आढावा...
निराधार बालकांना मायेचा आधार देऊन त्यांना हक्काचे घर व हक्काचे आई-बाबा मिळवून देण्याचे कार्य सोफोश हि संस्था गेली 55 वर्षे अविरत करीत आहे.
फोटो : गुगल सौजन्य |
प्रत्येक कुटुंबात जेव्हा बाळाची चाहूल लागते त्यावेळी सर्व घर आनंदून जाते, सर्वजण येणाऱ्या बाळाची अगदी आतुरतेने वाट पहात असतात. होणारे आई-वडील देखील येणाऱ्या बाळाच्या उज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत असतात आणि प्रत्यक्ष बाळाच्या आगमनाने तर आनंदोत्सवच साजरा केला जातो.
हे चित्र आपण घरोघरी पहातो परंतु काही बाळांच्या बाबतीत मात्र या गोष्टी नशिबात नसतात, ती जन्मताच यापासून वंचीत राहतात, त्यांच्यावर अनाथ असल्याचा शिक्का बसतो अशा मुलांसाठी सोफोश हि संस्था कार्य करते.
कुमारी मातांना झालेली मुले, सार्वजनीक स्थळी सापडलेली मुले उदा. कचरा कुंडी, रेल्वे स्टेशन, सार्वजनीक स्वच्छतागृहे या ठिकाणी सापडलेल्या अनाथ बालकांचे संगोपन आणि पुनर्वसन म्हणजे या बालकांना हक्काचे घर आणि आई वडील मिळवून देण्याचे कार्य सोफोश करते. हि संस्था शासन मान्य सेवाभावी संस्था आहे.
55 वर्षांपूर्वी ससून रुग्णालयातील सामाजीक कार्यकर्त्या मंदाकिनी द्रविड आणि हर्षीला मनसुखानी यांनी रुग्णांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी 1964 मध्ये डॉ. मेंडोंसा यांच्या मार्गदर्शनाखाली सोफोश ची स्थापना केली. या स्थापनेत जयश्री वैद्य, सुमन किर्लोस्कर, लीला मर्चंट, यशवन्त मेहंदळे आदी मान्यवरांचा देखील सहभाग होता.
Daycare for Aaji Aajoba : "आजी आजोबांचे पाळणाघर"
सुरवातीच्या काळात ससून मध्ये सुखसोईंचा आभाव होता. चहा-नाश्त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशनला जावे लागे, एम आर आय व इतर तत्सम टेस्ट साठी दुसऱ्या रुग्णालयात जावे लागे परंतु पैशा अभावी रुग्णांना ते शक्य नसे. इथे सोफोश मदतीला धावले.
ससून मध्ये अद्यावत मशिन्स बसवल्या, रुग्णवाहिका, तसेच चहा नाश्त्याची सोय आदी उपलब्ध करून दिले. थोडक्यात काय तर 'जिथे कमी तिथे आम्ही' हे सोफोश चे ब्रिदवाक्य झाले.
अशा या गरीब गरजूंसाठी कार्य करताना रुग्णालयात निराधार बालकांची वाढ होऊ लागली. याबाळांची काळजी इतरांसोबत घेतली घेऊ लागली त्यामुळे बाळे दगावण्याचे प्रमाण वाढले. एके दिवशी मंदाकिनी द्रविड आणि हर्षीला मनसुखानी यांना बाळासाठी वेगळा 'कक्ष' आणि वेगळी 'सुविधा' सुरु करण्याची कल्पना सुचली आणि यातूनच 'श्रीवत्स' चा जन्म झाला.
फोटो : गुगल सौजन्य |
बालकल्याण समितीच्या आदेशानुसार या संस्थेत सहा वर्षे वयोगटातील मुलांचे संगोपन केले जाते. या संस्थेत 100 मुलांची देखभाल करण्याची क्षमता असून सध्या 48 मुले वास्तव्यास आहेत. संस्थेत अनेकदा शारीरिक दृष्टया बहुविकलांग बालके देखील येतात, अशा मुलांची वेगळी काळजी घेण्यासाठी सोफोशने पिंपळेगुरव येथे 'तारा सोफोश धडफळे' सेंटर 2008 मध्ये सुरु केले.
फोटो : गुगल सौजन्य |
फोटो : गुगल सौजन्य |
आजपर्यंत सोफोशने 5232 बालकांना मायेचे छत्र दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कायदेशीर तत्वानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून मगच श्रीवत्स मधून मुल दत्तक दिले जाते.
44 वर्षांपूर्वी पहिले बाळ श्रीवत्स मधून दत्तक देण्यात आले. आतापर्यंत संस्थेने 3152 बालकांना त्यांचे हक्काचे घर आणि आई वडील मिळवून दिले, यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार 'लिसा स्थळेकर' हि सोफोश मधूनच दत्तक गेली आहे.
संस्थेच्या कार्याची माहिती सांगताना सोफोशच्या प्रशासकीय अधिकारी म्हणाल्या की आपल्या समाजात कुमारी माता व त्यांच्या मुलांचा स्वीकार केला जात नाही अशावेळी नाईलाजाने बालकांना संस्थेत आणून सोडले जाते.
बऱ्याच मुलांवर ती जगू नयेत म्हणून त्यांच्यावर ऍसिड फेकणे, वार करणे, रेल्वे ट्रॅक वर ठेवणे असे अघोरी उपाय केलेले असतात परंतु देव त्यांना कोणा ना कोणा मार्फत संस्थेत पोहोचवतो. अशा मुलांची काळजी घेण्यासाठी संस्थेत 65 केअरटेकर आहेत. अशी ही संस्था सर्वस्वी नागरिकांच्या देणग्यांवर सुरु आहे.
अशामुलांसाठी संस्थेत वेळोवेळी कार्यक्रमही आयोजित केले जातात, तसेच दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ज्या मुलांचा वाढदिवस असतो त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.
मुलांच्या आनंदासाठी सहलीचे देखील आयोजन केले जाते. एकूण काय तर मुलांच्या संगोपणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठीदेखील हि संस्था कार्य करते.
अशा या संस्थेच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा !!!
• कसा वाटला ब्लॉग..
• आवडला का..
• आवडल्यास जरूर शेअर करा पण नावासहित..
• कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन करणे कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर.. ✍🏻️
पुणे.
0 टिप्पण्या