आठवणींच्या देशात : तुम्ही देखील अनुभवलीत का अशी आठवणींच्या देशातील सफर..!

 आठवणींच्या देशात... 

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️







आयुष्यात आपण पुढे चालत असताना बऱ्याचवेळा मागे वळून पहातो. हे मागे वळून पहाणे म्हणजे आपल्या आयुष्यतील सुंदर आठवणी. या आठवणीत रमायला आपल्या सर्वांनाच आवडते. हल्लीच्या आधुनिक युगात त्या कॅमेऱ्यात बंद करून ठेवता येतात, पण पूर्वी हे कॅमेरे नव्हते, मग या आठवणी मनाच्या एका कोपर्यात दडून बसत असत. मधून मधून या आठवणींना आपण डोळे आणि मनरूपी पंख लावून उडत उडत या आठवणींच्या देशात फेरफटका मारून येत असतो.


अशीच आठवणींच्या देशातील सफर तुमच्या साठी घेऊन आलेय... बघा तुमच्या ओळखीची वाटतेय का? मला खात्री आहे की बऱ्याचजणींनी यातील कित्येक गोष्टी स्वतःदेखील अनुभवल्या असतील. चला तर मग जाऊयात "आठवणींच्या देशात.. !"



माझं बालपण एका खेडेगावात गेलं. गांव तसं छोटंसं, त्या काळी पाच हजार वस्तीचं असेल. तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता; त्यामुळे सर्वांचा दिवस लवकर उगवायचा. सकाळी अकरा वाजले की गावात शुकशुकाट पसरायचा. बऱ्याचशा घरातील बायका देखील सकाळी सगळे आवरून शेतावर जायच्या. आम्हाला शनिवारी अर्धी शाळा असायची, त्यादिवशी आम्ही खूप धम्माल करायचो.




फोटो : गुगल सौजन्य 🙏🏻




शाळेतून आल्यावर जेवण करून मी मैत्रिणीच्या घरी खेळायला जायचे. मैत्रिणीच्या आजीचा भाजीचा व्यवसाय होता. दर शनिवारी शेजारील गावी भाजीचा बाजार असायचा त्यामुळे शनिवारी दुपारी मैत्रिणीची आजी घरी नसायची; त्यामुळे आम्हाला मनसोक्त खेळायला मिळायचे.


मी, माझी मैत्रीण, तिची बहीण आणि छोटा भाऊ असे आम्ही चौघेजण भरपूर लपाछपी खेळायचो. मैत्रिणीचा भाऊ आमच्यापेक्षा लहान होता त्यामुळे त्याच्यावर राज्य आले की खूप गंमत यायची. आम्ही तिघी एकमेकींचे फ्रॉक घालत असू त्यामुळे खरे कोण आहे ते त्याला ओळ्खताच यायचे नाही आणि शेवट पर्यंत त्याच्यावरच राज्य यायचे. त्यालाही आवडायचे राज्य घ्यायला कारण त्यालाही कोणी मित्र नव्हते. 


मैत्रिणीकडे कोंबड्या होत्या, त्या अंड्याला आल्या की विशिष्ठ आवाज करायच्या व खुराड्या भोवती घुटमळायच्या. मग माझी मैत्रीण त्या कोंबडीला पकडून डालग्यात (कोंबडीचे घर) डालायची. थोड्या वेळाने आम्ही कोंबडीने अंडे दिले का चेक करायचो. अंडे दिल्यावर देखील कोंबडी विशिष्ट आवाज करायची, त्यामुळे कोंबडीने अंडे दिले हे लगेच कळायचे. ते अंडे एवढे गरम लागायचे ना! आम्ही सगळेजण ते डोळ्याला लावत असू, असा समज होता की गरम अंडे डोळ्याला लावले की कधीच डोळे येत नाहीत.



फोटो : गुगल सौजन्य 🙏🏻



मैत्रिणीची आई अंडी साठवून त्यावर खुडुक कोंबडीला २१ दिवस अंडी उबवायला बसवायची. २१ दिवसानंतर अंड्यातून कोंबडीची पिले बाहेर पडायची... ती बाहेर येताना आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्याने पहात असू. काय सुंदर असायची ती रंगीबिरंगी पिल्ले! त्यानंतर मांजरांपासून त्या पिलांचे रक्षण करावे लागायचे. बऱ्याचवेळा खेळता खेळता आम्ही हि जबाबदारी पार पाडत असू. मग ती पिले थोडी मोठी होऊ लागली की त्यातील कोंबडा कोणता अन कोंबडी कोणती हे ओळखणं आमचा छंदच होऊन जायचा.





 

एरवी चल्लस पाणी, आंधळी कोशिंबीर, आई माझं पत्र हरवलं, काचा कवड्या, पत्ते, सापशिडी, नवा व्यापार, दोरीवरच्या उड्या, भांडी-कुंडी, भोवरा, कँचे(गोट्या), शाळा-शाळा असे विविध खेळ आम्ही खेळत असू. त्यावेळी आमच्याकडे बजाजची स्कुटर होती, त्या स्कुटरचे खराब झालेले टायर आम्हा मुलाचे खेळणे बनले होते. आम्ही मुलं टायरला काठीने पळवत न्यायचो, विलक्षण गंमत वाटायची. मध्यन्तरी एका हुरडा पार्टीत लहानपणी खेळलेल्या या खेळांचे आयोजन केले होते, त्यावेळी कित्येक वर्षांनी टायर आणि भोवरा फिरवला. 

 

त्यावेळी आतासारखे टी. व्ही. नव्हते कोणाकडे. नाही म्हणायला गावात ग्रामपंचायतीमध्ये एक दूरदर्शन संच होता. त्यावर चित्रहार, छायागीत आणि शनिवार-रविवार चित्रपट पाहायला मिळायचा. एवढंच काय ते मनोरंजनाचे माध्यम होते त्यामुळे विविध खेळ खेळण्यास भरपूर वेळ मिळायचा.





आम्ही सातवी-आठवीत गेलो तेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. त्यावेळी आम्ही खूप खुश झालो होतो. बऱ्याचदा टीव्हीचा अँटिना कावळा, चिमणी बसल्याने हलत असे आणि त्यावेळी चित्र दिसणे बंद होई. अशावेळी एकजण घराच्या छतावर जाऊन अँटिना हलवी व खालून कोणीतरी त्याला सूचना देई. त्यावेळी हे चित्र सर्हास दिसे. बऱ्याचदा टीव्हीला मुंग्या यायच्या अशावेळी आम्ही टीव्हीला टपली मारायचो आणि टीव्ही पूर्ववत दिसू लागे, याची खूप गंमत वाटे. 


त्याकाळी आम्ही मैत्रिणी मिळून अभ्यासही करीत असू, त्यासाठी एकमेकींच्या घरी झोपायला जायचो. मग भल्या पहाटे घरातील वडीलधारी व्यक्ती आम्हाला अभ्यासासाठी उठवायची. सकाळी सात वाजेपर्यंत अभ्यास करून आम्ही आपापल्या घरी परतायचो. आई-वडिलांनी कधी मुले काय अभ्यास करताहेत बघितलं हि नाही. 

 

शाळेत जाताना आई २५ पैसे द्यायची, त्याच्या ५ दुधी गोळ्या यायच्या. शाळेत गेल्यावर ड्रेसमध्ये गोळी ठेऊन ती दाताने फोडायची आणि तयार झालेले तुकडे सगळ्यांनी मिळून खायचे. काय मस्त लागत असे त्यावेळी, आपण आज दिले की दुसऱ्या दिवशी मैत्रीणही द्यायची. त्यावेळी खप पैसे नव्हते कोणाकडे पण मनाची श्रीमंती खूप होती प्रत्येकाकडे.



माझी शाळा 


शाळेत डबा घेऊन गेल्यावर सगळे जण गोल करून बसत असू. प्रत्येकजण आपापल्या डब्यातील भाजी भाकरीचा घास प्रत्येकाला देत असू. त्यामुळे वेगवेळ्या भाज्या खायला मिळत आणि किती जेवलो हेही कळत नसे. पोट अगदी तुडुंब भरायचे, सगळ्या भाज्या पोटात जायच्या. ते दिवस, ती मैत्री काही औरच! त्याला कशाचीच तोड नाही.


My School - आठवणी शाळेच्या....


शाळेत बबिता नावाची माझी एक मैत्रीण होती, शाळेपासून थोड्या अंतरावरच एका शेताच्या बांध्याला तिचं घर(झोपडी) होती. तिचे वडील शेतमजूर होते, आई ही शेतात जायची. त्यांच्या आख्या खानदानात कोणी शिकले नव्हते पण बबिताला शिकवायची त्यांची खूप इच्छा होती आणि ती शिकतेय याचा अभिमान हि होता.


मधल्या सुट्टीत आम्ही बबिताच्या घरी जात असू, तिचे ते घर आम्हाला खूप आवडायचे. किती छान आणि प्रसन्न वाटायचे तिथे. तिथे ना लाईट ना पाणी. दिव्याच्या उजेडात ती अभ्यास करायची. गरिबी काय असते हि अगदी जवळून पाहिली त्यामुळे कधी कधी वाईट हि वाटायचे, पण माझी मैत्रीण नेहमी आनंदी असायची. ऊस, कैऱ्या, बोरे, चिंचा किती मनसोक्त खायचो आम्ही, आता नुसते आठवले तरी तोंडाला पाणी सुटते. 


दरवर्षी दसऱ्याच्या दिवसात आम्ही भोंडला करायचो, फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणायचो. नऊ दिवस रोज वाटीत खिरापत घेऊन जायचो. हि वाटी फ्रॉकने झाकलेली असायची. वास घेऊन खिरापत ओळखायची आणि थोडी थोडी सर्वाना वाटायची, खूप मजा यायची.


शेवटच्या दिवशी सर्वजण आपापल्या घरून काही साहित्य घेऊन यायचो जसे की डाळ, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, कांदा, मिरची, तेल, मीठ, तिखट सर्व साहित्य जमा झाले की एका मैत्रिणीच्या घरी स्वयंपाक करायचो आणि सर्वजण गोल पंगत करून जेवायला बसायचो. खूप मज्जा यायची. 


लग्ना आधी मी कधी पुरण पोळी केली नव्हती, आईच करायची. लहानपणी आईला मी पुरणाला चटका देताना म्हणजे त्यात गुळ घालताना बघितले होते. एकदा अशाच एका सणाच्या दिवशी मी माझ्या शेजारील मैत्रिणीच्या घरी गेले. तीही माझ्या एवढीच, पण तिची आई शेतात जायची त्यामुळे संध्याकाळचा निम्मा स्वयंपाक ती करून ठेवायची. 


भाकरी, उपवास असेल त्यादिवशी चपाती, भात इ. त्यादिवशीही बहुतेक होळीचाच सण होता, दुपारीच तिने डाळ शिजत ठेवली होती पण पुरण कसे करायचे तिला माहित नव्हते. तिने मला विचारले आणि मीही आईला नुकतेच डाळीत गुळ घालताना पाहिले होते त्यामुळे तिला हो म्हणाले.


पुरण पोळी 


 

आईने डाळीतील पाणी काढले होते हे मला माहित नव्हते त्यामुळे मी तिला त्या डाळीत गुळ घालायला सांगितला आणि तिनेही डाळीत गुळ घातला नंतर मात्र डाळीतील पाणी काही केल्या आटेना; त्यावेळी आम्ही दोघीही खूप घाबरलो. मी घरी पळून आले पण माझ्या मैत्रिणीला मात्र तिच्या आईचा ओरडा बसला.


दुसऱ्या दिवशी हे मी माझ्या आईला सांगितले तर तिने कपाळावर हात मारून घेतला आणि मैत्रिणीच्या आईला डाळ आणि गुळ देऊन आली. तेव्हा समजले की डाळीतील पाणी काढायचे असते आणि मग त्यात गुळ घालायचा असतो; मात्र डाळीतील काढलेल्या या पाण्याला फोडणी देतात ज्याला आपण कटाची आमटी म्हणतो हे मात्र सासरी आल्यावर कळले. 

 

 कॉलेज मध्ये असताना ऑफ पिरेडला कँटीन मध्ये आपापल्या पैशाने मैत्रिणींसोबत खाल्लेली मिसळ, तर कधी वडापाव.. आहाहा ! अजूनही पाणी सुटते तोंडाला. दरवर्षी वार्षिक परीक्षा झाल्यावर शेवटच्या दिवशी सगळ्या मैत्रिणी मिळून जो असेल तो बघितलेला सिनेमा आजही आनंद देऊन जातो.

 

आजही या गोष्टी आठवल्या की त्या दिवसांची मजा डोळ्यासमोर उभी राहते मात्र त्याकाळात त्याचं महत्व समजलं नव्हतं जे आता जाणवतं. नकळत्या वयातील ती मैत्रीही खूप काही शिकवून गेली. तेव्हा कुठे माहीत होतं की या मैत्रीची शिदोरी आपणाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे.


•कशी वाटली आठवणींची हि सफर... तुम्हीदेखील यातील काही गोष्टी नक्की अनुभवल्या असतील.


•सफर आवडली तर कमेंट करा, फॉलो करा आणि तुमच्याही आठवणी जरूर शेअर करा.👍


 धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या