कविता : "दोन शब्द प्रेमाचे.."



"दोन शब्द प्रेमाचे.."


मी हट्टी, ती समंजस,

मी अडेल तट्टू, ती कणखर..

मात्र कधीच मिटले नाही,

आमच्यातील अंतर..!


ती अबोल, मी बडबडा,

मनात येईल ते बोलणारा..

ती सोशीक, मी उतावळा,

नेहमी आकांड तांडव करणारा..!


चहा गार होत आहे,

कितीवेळा सांगायचं..

पेपर पळून जात नाही,

तीचं रोजचं पलूपद चालायचं..! 


त्यावेळी मी नेहमी,

हसण्यावरी घेतलं..

तिला सतावण्यात मात्र,

नेहमीच सुख शोधलं..!


My favorite fruit : Mango माझं आवडतं फळ 'आंबा'


आता मात्र मी आधी चहा घेतो,

अन नंतर पेपर वाचतो..

माझी काळजी घेणाऱ्या तिला,

रोज आठवत बसतो..!


आयुष्यात झालेल्या चुका,

मनात सलत असतात..

गार झालेल्या चहा सारखं,

आयुष्य बेचव बनवतात..!


ती असताना किंमत तिची,

कधी कळलीच नाही..

तिला काय हवं याचा साधा,

विचारही कधी केला नाही..!


तेरा राग मेरा संतोष म्हणत,

नेहमीच हसण्यावारी नेलं..

तिचं मन जाणायचं मात्र,

तसंच राहूनच गेलं..!


वेळ निघून गेल्यावर,

पश्चातापाला तसा अर्थ नसतो..

तिच्या विरहात तिची आठवण,

काढण्याखेरीज आता दुसरा मार्ग नसतो..!


पश्चातापाचे हे बोल,

देणार नाहीत चुकीचा सल्ला..

वेळीच सावध व्हा मित्रांनो,

प्रेम द्या अर्धांगिनीला..!


Marathi Kavita : Mother-in-law सासू म्हणजे सासू असते, तुमची आमची सेम असते.. तिच्या जागी स्वतःला ठेवले, तर आपल्यालाही ती कळून चुकते..!


उतारवयात एकटे राहणे,

फार अवघड असते..

तिच्याशिवाय जीवन जगणे,

तितके सोपे नसते..!


पेराल ते उगवते,

जे द्याल ते परत मिळते..

सृष्टीचा हा नियमच आहे,

याला कोण अपवाद असते..!


शेवटी काय हो, दोन शब्द प्रेमाचे,

आठवण बनून जातात..

अन तिच्या मागे जगण्याचे,

बळ देऊन जातात..!


©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️


• कशी वाटली कविता..

• आवडली का..

• आवडल्यास जरूर शेअर करा..

• पण माझ्या नावासहित..

• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या