Marathi Kavita : 'चहा गार होत आहे' प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या भावनांची खिल्ली न उडवता तिची तळमळ, प्रेम समजून ते जपले तर किती छान होईल नाही.




"चहा गार होत आहे..!"


© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️


चहा गार होत आहे,

कितीवेळा सांगायचं..

पेपर पळून जात नाही,

तीचं रोजचं पलूपद चालायचं..!


त्यावेळी मी नेहमी,

हसण्यावरी घेतलं..

तिला सतावण्यात मात्र,

नेहमीच सुख शोधलं..!


आता मात्र मी आधी चहा घेतो,

अन नंतर पेपर वाचतो..

माझी काळजी घेणाऱ्या तिला,

रोज आठवत बसतो..!


आयुष्यात झालेल्या चुका,

मनात सलत असतात..

गार झालेल्या चहा सारखं,

आयुष्य बेचव बनवतात..!






या कवितेच्या जन्माची कहाणी..


सहज लिहिता लिहिता सुचलं. चहा गार होत आहे हे title आहे. सुरुवातीच्या दोन लाईन प्रत्येकाच्या घरी बऱ्याचदा बोलल्या जातात. त्या लिहिल्या अन पुढे आपोआप लिहिलं गेलं.. आणि पूर्ण झाल्यावर मलाही समजलं.


शांतपणे 2-3 वेळा वाचलं आणि या 4 कडव्यातून खूप काही सांगितलं गेलंय हे ही समजलं. काही गोष्टी ठरवून नाही होत, तसच काहीस झालंय.


पहिल्या 2 लाईन लिहिताना सासूबाई आणि सासऱ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आले. त्यांचं नेहमी असंच व्हायचं. सासरे नेहमी सासूबाईंना म्हणायचे, "तेरा राग मेरा संतोष.." आणि हसायचे. पण आता त्या नाहीत.


असं सासर सुरेख बाई.. खरंच या प्रेमाला उपमा नाही.  असं प्रेम प्रत्येकीला मिळालं तर..!

नकळत वाटणाऱ्या भावना शब्दातून व्यक्त झाल्या. हे वाचून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या भावनांची खिल्ली न उडवता तिची तळमळ, प्रेम समजून ते जपले तर किती छान होईल नाही. यात खिन्नता असली तरी यातील वास्तव विचार करायला नक्की भाग पाडेल.


जीवन हे आनंदाने हसत हसत जगाव माणसानं  म्हणजे कितीही संकटे आली तरी त्याचा फारसा वाईट परिणाम होत नाही उलट त्यातून बाहेर पडण्याचा मार्गचं सापडतो.


खरं तर एकमेकांच्या भावना जपल्या तर आयुष्याची संध्याकाळ ही शांत, सुसह्य  होईल म्हणजे त्यात खिन्नता, दुःख, पश्चाताप नसेल तर समाधान असेल.



कुठेतरी मनातील हे विचार या कवितेतून व्यक्त झाले. ही कविता वाचून एकाने जरी आपल्या पत्नीच्या भावनांची खिल्ली न उडवता तिला समजून घेतले तरी माझे कविता लिहिण्याचे सार्थक झाले असे मी समजेन.


•कशी वाटली कविता आणि त्यामागील माझ्या भावना..


•आवडल्या तर जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित..


•कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद!


© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या