लघुकथा : "त्रिकोणाची तिसरी बाजू"

"त्रिकोणाची तिसरी बाजू"

#लघुकथा

©सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️




आज सुनिधी आणि श्रीकांतच्या पिल्लाचा 7 वा वाढदिवस. तिच्या पिल्लाइतकीच तीदेखील खूप आनंदात होती. बघता बघता तिचं पिलू सात वर्षांचे झाले होते. काळ कोणासाठी थांबत नसतो हेच खरे. पावणेसात वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही तिला डोळ्यासमोर जसाच्या तसा दिसत होता. हा दिवस तिच्यासाठी सुवर्णाक्षरात कोरण्या इतका महत्वपूर्ण होता.


सुनिधी आणि श्रीकांतच्या लग्नाला 12 वर्षे होऊनही स्वतःच मूल होऊ शकलं नव्हतं. सर्व उपाय करून झाले पण काही उपयोग झाला नाही. तिलाही वाटे की आपल्याही वाट्याला ते सुख यावे जे दिवस गेलेली प्रत्येक स्त्री अनुभवते.


दिवस राहिल्यावर होणाऱ्या उलट्या, आनंदच्या बातमीने सगळ्यांचे उजळलेले चेहरे, होणारे गोडकौतुक, प्रत्येक क्षणी तिला जपणारा नवरा, प्रत्येक महिन्यागनिस शरीरात होणारे बदल, एका गोंडस बाळाला प्रत्यक्ष जन्म देण्याचा अनुभव आणि सर्वात सुंदर असा बाळाला फिडिंग करण्याचा अनुभव.


या सर्व स्त्रीसुलभ भावना सुनिधीच्या मनातदेखील होत्याच की पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत अशावेळी त्या स्विकारण्याखेरीज आपल्याकडे पर्याय नसतो हे तिला माहीत होते.


जगरहाटी : प्रत्येक मुलीला एकदिवस आपलं घर सोडून सासरी जावं लागतंच.


आपण एका बाळाला जन्म देऊ शकत नसलो तरी एका अनाथ बाळाचे आईवडील होऊन त्याच्या पालनपोषणाचं सुख तरी नक्कीच घेऊ शकतो हा सुज्ञपणा तिच्याकडे होता. त्यामुळे मागच्याच वर्षी त्यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी लागणारे सर्व सोपस्कर पूर्ण केले होते.


मागच्या वर्षी याच दिवसात एकदिवस केस विंचरताना सुनिधीला एक पांढरा केस दिसला आणि ती हबकलीच. वाढणाऱ्या वयाने आपला चेहरा दाखवला होता, तिने श्रीकांतलाही तो पांढरा केस दाखवला. तो धक्का तिला सहन झाला नाही. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि ती रडू लागली.


श्रीकांतला तिच्या या वागण्याचं हसू आलं आणि ते पाहून तिला जास्तच रडू कोसळलं. तो दिवस आणि ती रात्र ती खूप रडली, असं का होतंय हे त्यावेळी तिला कळत नव्हतं पण रडू मात्र खूप येत होतं. तिने मनसोक्त रडून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःशीच निश्चय करून तिने एक निर्णय घेतला.


आपला हा निर्णय तिने श्रीकांतला सांगितला, 'आता काहीही करून मला बाळ हवंय, स्वतःच्या बाळाची आई झाले नाही तरी एका अनाथ मुलाची आई मी नक्की होऊ शकते', 'आपण मुल दत्तक घेऊयात, मला आई व्हायचंय आणि आता हा एकच मार्ग आपल्यापुढे आहे'. आतापर्यंत गांभीर्याने न घेतलेल्या श्रीकांतलाही तिचे म्हणणे पटले.



सुनिधीच्या भावाच्या मित्राने दहा वर्षांपूर्वी एक मुलगी दत्तक घेतल्याचे सुनिधीला ठाऊक होते त्यामुळे भावाच्या मदतीने ते दोघे अनेक प्रश्न घेऊन तिच्या भावाच्या मित्राला भेटले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली होती. तसेच त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा देखील सल्ला घेतला आणि त्यासाठी लागणारी सर्व प्रोसेस पूर्ण केली होती.


गेले वर्षभर ज्या दिवसाची ते आतुरतेने वाट पहात होते तो दिवस आज उगवला.   आज एक गोंडस मुलगी त्यांना मिळणार होती. सुनिधीला सारे स्वप्नवत भासत होते, ती स्वतःला सारखे चिमटे काढून पहात होती की खरंच हे स्वप्न तर नाही ना आणि तो क्षण आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुनिधीच्या ओटीत एका सुंदर राजकन्येला घातले आणि "आजपासून तुम्ही या राजकन्येच्या आई झालात" असे सांगून तिघांचे औक्षण केले.


त्याक्षणी झालेला बाळाचा पहिला स्पर्श सुनिधीला मोहरून गेला. आज खऱ्यार्थाने ती आई झाली होती. जन्म देणारी एखादी आई जेव्हा सर्वप्रथम आपल्या बाळाला पहाते तेव्हा तिला काय वाटत असेल हेच ती बाळाच्या त्या पहिल्या स्पर्शातून अनुभूवत होती.


तीचं मन अगदी भरून आलं. इवलेसे हात-पाय हालवत ते बाळ तिच्याकडे पहात होते, "आई, इतके दिवस तू कुठे होतीस?" जणू असेच त्याला विचारायचे होते. त्याचा नाजूकसा स्पर्श तिच्या हातांना सुखावत होता. यावेळी तिच्याकडे शब्द नव्हते, फक्त तिचे डोळे भरून वहात होते.


सुनिधीला आत्ता याक्षणी काय वाटतंय याची कल्पना श्रीकांतला आली आणि त्याने काही न बोलता फक्त तिच्या पाठीवर थोपटले. त्या आश्वासक थोपटण्यानेही सुनिधी सुखावली. दोघेही राजकन्येला घेऊन घरी आले. घरी आल्यावर सर्वांनी आनंदात स्वागत केले, औक्षण केले आणि राजकन्येचा आनंदात गृहप्रवेश झाला.


Slum Area : आणि झोपडपट्टी बोलू लागली (झोपडपट्टीचे मनोगत)


आज हिच राजकन्या सात वर्षांची झाली होती. हि सात वर्षे कशी गेली हे सुनिधी आणि श्रीकांतला कळलेदेखील नव्हते. ते दोघेही आपल्या संसारात सुखी आणि आनंदी होते कारण त्यांच्या राजकन्येने त्रिकोणाची तिसरी बाजू पूर्ण केली होती.


• कशी वाटली कथा..


• आवडली का..


• कथा आवडल्यास कमेंट करा, फॉलो करा.


• आणि कथा शेअर करावीशी वाटल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित.


• कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या