Positive Self Dialog : 'सकारात्मक स्व:संवाद' जेव्हा तुम्ही स्वतःशी सकारात्मक संवाद साधता तेव्हा येणाऱ्या कठीण परिस्थितीवर नक्की मात करू शकता.

 सकारात्मक स्व:संवाद... 

 ©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️






कोणतीही व्यक्ती सर्वगुण संपन्न नसते आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, या दोन्ही गोष्टींना तराजू मध्ये तोलले असता म्हणजे एका पारड्यात चांगल्या गोष्टी आणि दुसऱ्या पारड्यात वाईट गोष्टी किंवा घटना तर चांगल्या गोष्टींचेच पारडे जड होताना दिसते, असे असताना आपण त्या वाईट गोष्टींवर फोकस न करता त्याचा स्वीकार केला की पुढचा मार्ग सुखकर होतो.


बऱ्याचदा आपण वाचतो, ऐकतो आणि बोलतो देखील कि सुख हे मानण्यावर असते, म्हणजे घडलेल्या घटनेकडे तुम्ही कसे पाहता यावर सर्वस्वी ते अवलंबून असते. घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर सुख, शांती,आनंद मिळते आणि घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असेल तर दुःख, राग, द्वेष, मत्सर पर्यायाने सुडाची भावना उत्पन्न होते.


Positive Mind : "आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार"


सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन ओळखण अगदी सोपं आहे. कोणतीही घटना घडली की तत्क्षणी आपल्या मनात एक विचार येतो आणि त्याबरोबर एक भावनादेखील येते. तो विचार सकारात्मक असेल तर त्याबरोबर येणारी भावना हि सुख, शांती, आनंद देणारी असते आणि तो विचार नकारात्मक असेल तर त्याबरोबर येणारी भावना हि दुःख, राग, द्वेष, निराशा देणारी असते.


एखादी घटना घडल्याने मनाला आनंद मिळाला, छान, प्रसन्न वाटले तर त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सकारात्मक आहे आणि एखादी घटना घडल्याने मनाला वाईट वाटले, दुःख झाले, राग आला तर त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन नकारात्मक आहे असे समजावे. 


थोडक्यात तुम्ही सकारात्मक आहात की नकारात्मक हे तुमचा दृष्टिकोन ठरवत असतो. आपला दृष्टिकोन बदलला तर परिणाम आपोआप बदलतो. सकारात्मकतेसाठी स्वीकार हा महत्वाचा ठरतो.


जोपर्यंत एखादी घटना, व्यक्ती आपण स्वीकारत नाही तोपर्यंत त्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार आपल्या मनात येत राहतात परंतु जर आपण त्या घटनेचा किंवा त्या व्यक्तीचा ती जशी आहे तशी स्वीकार केला तर त्या घटनेकडे अथवा व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि त्याबद्दलचा विचार सकारात्मक होतो, त्यामुळे आपोआपच भावना बदलते.


आपल्या दुःखाचं मूळ आपल्या विचारात असतं, आपण मात्र त्याचं खापर दुसऱ्यावर फोडत असतो. काही वाईट अथवा चुकीचं घडलं तर ते माझ्यामुळे नसून त्याला दुसरी व्यक्ती कशी जबाबदार आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःची चूक मान्य न करण्यासाठी कारणे देत असतो.


असं सासर सुरेख बाई.. खरंच या प्रेमाला उपमा नाही. असं प्रेम प्रत्येकीला मिळालं तर..!


खरे तर स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वतः घेतली तर दुःखाचे प्रमाण खूप कमी होईल पण वास्तवात असे खूप कमी घडते आणि म्हणूनच माणसाच्या आयुष्यात दुःखी होण्याचे प्रसंग वारंवार येताना दिसतात. छोट्या छोट्या कारणानेही माणूस हर्ट होताना दिसतो.


डिप्लोमा इन कोन्सेलिंग सायकॉलॉजीचा अभ्यास करीत असताना फ्रॉईड, कार्ल युंग, अल्बर्ट एलिस, अडलेर अफ्रेड यांच्या थेअरीज आणि थेरपीचा अभ्यास करण्याचा योग आला. फ्रॉईड यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते. यांनी मनाच्या तीन अवस्था सांगितल्या..


1. संवेदनशील मन (conscious),

2. सुप्त मन (sub-conscious) आणि 3. बेशुद्ध मन(unconscious).


प्रत्येक माणूस विचारांच्या लहरी सोडत असतो आणि प्रत्येक मन ते कॅपचर करत असतं. 'तुम्ही ज्या तऱ्हेने विचार करता त्यावर तुमच्या मनातल्या भावना अवलंबून असतात आणि म्हणून जर तुम्ही तुमची विचारांची पद्धत बदलली तर तुम्ही तुमच्या भावनाही बदलू शकता' असं प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ अल्बर्ट एलिसने म्हटले आहे.


एलिसने स्वतःच्या आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीत स्वतःचे समुपदेशन करून आनंदी राहण्याचा स्वतःलाच सल्ला दिला आणि तो आमलात आणण्यास सुरुवातदेखील केली.


यासाठी त्याने एक अफलातून मार्ग शोधून काढला. भरकटत जाणाऱ्या मनाला समजावण्यासाठी त्यानं सुयोग्य कार्ड्स तयार केली. त्यातलं कुठलंही कार्ड वाचलं की मनात येणारे नकारात्मक विचार कमी होऊन त्याची तीव्रता आपोआपच कमी होई. त्याने कार्ड वर लिहिलेले विचार असे होते…


1. 'प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला पुढे जाण्याचं बळ देते'.

 

2. 'हे दिवसही जातील; काळ कोणासाठीच थांबत नसतो'.

 

3. 'आजची परिस्थिती उद्या बदलणार आहेच; आज कदाचित जो जास्त त्रासदायक दिवस आहे तो उद्या बदललेला नक्कीच असेल.'

 

रोज सकाळी हे वाचूनच तो कामाला सुरुवात करीत असे. 'माणूस जेव्हा आपल्या दृष्टिकोनात म्हणजे विचारात मुळापासून बदल करतो तेव्हा तो त्याच्या भावनाही बदलू शकतो आणि मग त्याच्या वागणुकीत आश्चर्यकारक बदल घडतो' असं एलिसचं ठाम मत होतं.


सकारात्मक स्व:संवाद जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा येणाऱ्या कठीण परिस्थितीवर मात नक्की करू शकता. सकारात्मक बोलल्याने आत्मविश्वास दुणावतो व नकारात्मक विचारामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि गोष्टी, घटना त्याप्रमाणे घडायला सुरुवात होते.


Joke : एक किस्सा


उदा. दोन मुले खेळत असतात, खेळता खेळता ते जवळच्या एका झाडावर चढू लागतात हे त्या दोन्ही मुलांच्या आया बघतात. एक आई बोलते, 'अरे, कशाला चढतोस वर, पडशील ना!' तर दुसरी आई बोलते, सावकाश चढ रे आणि काळजी घे'. थोड्या वेळात त्यातील एक मुलगा पडतो ज्याला त्याची आई पडशील ना! असे म्हटलेली असते आणि एक व्यवस्थित चढतो ज्याला त्याची आई काळजी घे रे असे बोलली होती.


येथे सकारात्मक विचारांमुळे एका मुलाचा आत्मविश्वास वाढला व तो व्यवस्थीत झाडावर चढला आणि नकारात्मक विचारामुळे दुसऱ्या मुलाचा आत्मविश्वास कमी झाला आणि तो मुलगा खाली पडला. 


थोडक्यात संवाद असो वा स्व:संवाद तो सकारात्मक होणं महत्वाचं किंवा तो सकारात्मक कसा होईल यासाठी प्रयत्न करने आवश्यक आहे.


•कसा वाटला ब्लॉग..


•आवडला का..


•आवडल्यास जरूर कमेंट करा आणि मला फॉलो करा..


•आपल्याला मिळालेली सकारात्मक माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.


•आणि हो.. ब्लॉग शेअर करायला विसरू नका.. पण माझ्या नावासहित.


•कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


 धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या