Marathi Recipe : Shevpav "शेवपाव" रोज वेगळं काय बनवायचं प्रश्न पडतो ना..! मग शेवपाव आहे संध्याकाळच्या नाश्त्याला उत्तम पर्याय. बनवा घरच्या घरी, मुलेही होतील एकदम खुश!




Marathi Recipe : Shevpav "शेवपाव", रोज वेगळं काय बनवायचं प्रश्न पडतो ना..! मग शेवपाव आहे संध्याकाळच्या नाश्त्याला उत्तम पर्याय. बनवा घरच्या घरी, मुलेही होतील एकदम खुश! 


 ● शेवपाव


         'शेवपाव' नाव नवीन वाटतंय ना ! पण अतिशय सुंदर लागतो. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणी आणि आम्ही त्यांच्या आया मिळून बागेत गेलो होतो. बागेत खेळून झाल्यानंतर मुलींना खूप भूक लागली म्हणून मग बागेच्या बाहेर कुठे भेळीची गाडी दिसतेय का पाहू लागलो.


शक्यतो बागेच्या जवळपास भेळीची एक तरी गाडी नक्की असते पण इथे नव्हती. तसेच पुढे चालत कुठे हॉटेल दिसते का पाहू लागलो तर एका कोपऱ्यावर सँडविचची टपरी दिसली. तिथे मुलींनी आपापल्या आवडीचे सँडविच घेतले. टपरीच्या बाजूला काय काय मिळेल याचा बोर्ड होता.


Marathi Recipe : "नाचणी लाडू" आरोग्यदायी नाचणीचे पोषक लाडू. वाचा नाचणीच्या सेवनाचे अनेक फायदे


वाचता वाचता एका नावावर नजर खिळली कारण आमच्यासाठी ते नाव नवीन होते. टेस्ट करून बघुयात म्हणून एकाची ऑर्डर केली, त्यात चार पीस आले आम्ही तिघींनी एक एक पीस घेतला आणि तोंडात घातला तर आहाहा ! एकदम अप्रतिम चव होती.


मग आणखी मागवले आणि मुलींना देखील आवडले. त्यानंतर जिथे जिथे कच्छी दाबेली मिळते तिथे तिथे हा शेवपाव मिळतो हे लक्षात आले. मग दाबेली सोबत एक शेवपावची ऑर्डर ठरलेली असायची. शेवपाव बनवायला एकदम सोपा आहे.


● शेवपाव साठी लागणारं साहित्य.. ⤵️


• बन 

• मेयोनीज

• तिखट शेव

• काकडी

• कांदा

• चिंचेची चटणी

• हिरवी चटणी

• बटर किंवा तूप


Marathi Recipe : करा मिश्र भाज्यांचे पोष्टिक आप्पे. झटपट होणारे हे आप्पे मुलेही खातील अगदी आवडीने





       एकदम सोपी रेसिपी आहे.. तयारी फारशी करावी लागत नाही. यातले बरेचसे साहित्य घरी असतेच. स्वीट बन आणि मेओनिज फक्त आणावे लागले बाकी हलदीरामची शेव घरी होती, शिवाय काकडीही घरी होती. तिची साले काढून उभे आडवे असे मोठे मोठे काप केले.


कांदा बारीक चिरून घेतला आणि भेळीसाठी केलेली चिंचेची चटणीही होती. 4-5 हिरव्यामिरच्या, मीठ, थोडा पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून हिरवी चटणीही चटकन तयार केली.


Marathi Recipe : Veg Crispy 'व्हेज क्रिस्पी' तुम्ही कधी घरी बनवलीत का..? या पद्धतीने बनवा मुले होतील अगदी खुश !


● शेवपाव बनवण्यासाठी आवश्यक कृती.. ⤵️


          बटर, तूप काहीही चालेल जे असेल ते घ्यावे. माझ्याकडे फ्रीज मध्ये अमूल बटर होते, त्यातील थोडे बटर तव्यावर घालून त्यावर बन दोन्ही बाजूने शेकून घेतला. बनला मध्ये आडवा काप देऊन आतील बाजूस चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी लावली व त्यावर कांदा, काकडीचे काप पसरवले वरून मेयोनिज घातले व भरपूर शेव घालून बन बंद केला आणि पुन्हा एकदा तव्यावर हलकासा शेकून घेतला आणि सर्व्ह केला "शेवपाव" !






• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.


• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या