कोथिंबिरीची_भाजी
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
आज तुमच्या भेटीला घेऊन आलेय गरमागरम कोथिंबिरीची भाजी अन खरपूस चपाती. आम्हा बायकांना नेहमीच प्रश्न पडत असतो… रोज काय करायची भाजी..? बरं असं ही नसतं की घरात काही भाज्या नाहीत. कधी कधी तर भाजीला जाऊन भाज्या घेऊन आलो तरी असा प्रश्न कित्येक वेळा पडतो.. याचं कोडं अजून तरी मला उलगडलेलं नाही.
आजही असेच झाले. काय करू.. काय करू करत शेवटी कोथींबीरीची भाजी बनवली. ही भाजी बनवायला मी माझ्या सासूबाईंकडून शिकले. माझ्या माहेरी कोथिंबीर भरपूर असायची पण त्याची भाजी कधी केली नव्हती. नेहमी कोथींबीरीच्या वड्याच केल्या जायच्या त्यामुळे कोथिंबिरीची भाजी देखील करतात हे मला माहीत नव्हते.
सासरी आल्यावर कोथिंबिरीची भाजी खाल्ली अन याची चव कळली.. एकदम भन्नाट लागते. सोबत गरमागरम तूप लावून भाजलेली खरपूस चपाती अगदी तव्यावरून ताटात घ्यायची.. अहाहा..! अप्रतिम! 👌🏻👌🏻लागते. तुम्ही देखील करून बघा तुम्हाला देखील आवडेल. मुलेही होतात भलतीच खुश! माझ्या लेकीला देखील खुप आवडते ही भाजी त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नक्की केली जाते.
Marathi Recipe : How to make - हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी
भाजी घरात नसेल किंवा भाजी काय करू असा प्रश्न पडला असेल तर कोथिंबीरीची भाजी करून बघा.. वेळ तर साजरी होतेच पण पोट ही भरते. सकाळच्या नाष्टया साठी तसेच टिफिनसाठी हा उत्तम आणि भरपेट असा पर्याय आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग पाहुयात याची साहित्य आणि कृती.
कोथिंबिरीची भाजी
कोथिंबीरीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य.. ⤵️
• कोथिंबीर 1 जुडी
• कांदे 2 मध्यम आकाराचे
• टोमॅटो 1
• हिंग पाव चमचा
• हळद पाव चमचा
• पांढरे तीळ 1 चमचा
• हिरवी मिरची 5-6
• लसूण पाकळ्या 4-5
• जिरे अर्धा चमचा
• मीठ आवश्यकतेनुसार
• बेसन पीठ 1 वाटी
• तेल 2 tbsp
कोथिंबीरीची भाजी बनवण्याची कृती.. ⤵️
प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चाळणीवर निथळायला ठेवावी. यानंतर कंदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. जिरे, लसूण, हिरवीमिरची आणि थोडेसे मीठ घालून मिक्सरला बारीक वाटण करून घ्यावे. यानंतर निथळलेली कोथिंबीर विळीने किंवा सुरीने अथवा कात्रीने बारीक कापून घ्यावी. आता गॅसवर एका कढईत तेल घालावे.
तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद, तिळाची फोडणी करावी. त्या फोडणीत हिरवी मिरची, जिरे चे वाटण घालून परतावे. यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालावा. थोडे परातल्यावर चिरलेली कोथिंबीर घालावी. चिमूटभर साखर घालून पुन्हा परतावे. यात पाव वाटी पाणी घालून एक मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ आणावी. यानंतर यात आवश्यकतेनुसार बेसन पीठ घालावे व एकसारखे हलवून पुन्हा झाकण ठेवून भाजीला वाफ आणावी.
आवश्यकता वाटल्यास बाजूने एक चमचा तेल सोडावे आणि भाजी चांगली हलवून घ्यावी. खमंग वास दरवळू लागला की समजायचे आपली भाजी तयार झाली. आता गॅस बंद करावा आणि गरमा गरम चपातीसोबत कोथिंबीरीची भाजी सर्व्ह करावी. चव अतिशय सुंदर लागते. नक्की करून बघा. 👍🏻
Marathi Recipe : 'कोथिंबिरीची भाजी' |
Evening Snacks : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव'
टीप : टोमॅटो ऐछीक आहे. पण कधीतरी वेगळी चव म्हणून try करायला काहीच हरकत नाही.
• कशी वाटली रेसिपी
• आवडली का..
• आवडली असेल तर जरूर कमेंट करा..
• आणि आवडल्यास शेअर देखील करा.. पण माझ्या नावासहित..
• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर... ✍️
0 टिप्पण्या