"आठवणीतील हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी..."
#आजकायस्पेशल
© सौ. सुचिता वाडेकर...✍
हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी ©Suchitawadekar |
● थोडासा चेंज…
कधीतरी चेंज ही हवा ना.. नाहीतर रोज-रोजच्या सुरीली जगण्याचा कंटाळा येतोच की माणसाला... हे सुद्धा तसेच.
परवा आमच्या शेजारच्या काकू हातात एक पिशवी घेऊन आल्या... म्हणाल्या,
"अगं, गावाकडून शेतातील हरभऱ्याच्या पानांची वाळलेली भाजी आणलीय... तुला आवडते का..? देऊ का तुला.. ? करशील..!"
"अरे वा! करेन की... खूप दिवस काय.. कित्येक वर्ष झाले मी पण खाल्ली नाही हि भाजी."
"माझी आई करायची माझ्या लहानपणी... त्यावेळी खाताना सुरुवातीला नाक मुरडले होते... पण टेस्ट केल्यावर आवडली" मी.
त्यांनी समाधानाने पिशवी ओट्यावर ठेवली आणि तू केल्यावर मलाही दे टेस्टला... असे सांगून गालातल्या गालात हसत 😀 निघून गेल्या.
आज मात्र भाजी करायला घेतली... अन ती कशी करायची माहीत कुठे होते.. 🤔 लहानपणी फक्त खाल्ली होती.
थोडा विचार केला... 🙄 त्याला काय लागतंय.. चला करूयात आपल्या पद्धतीने असे म्हणत त्यावेळी जसे सुचेल तशी मी भाजी बनवली आणि काय सांगू…! एवढी अप्रतिम झाली ना... अगदी माझी आई आणि आजी बनवायच्या तशी..!👌👌
'जुनं ते सोनं' असं म्हणतातना... याची किंमत जेव्हा ती वस्तू खूप वर्षांनी आपल्याला मिळते तेव्हाच समजते. अगदी असंच आज काहीसं माझं झालं होतं.
भाजी तर बनवायची आहे, मग ती कशी असायला हवी हे लहानपणी खाल्लेल्या भाजीच्या चवीचा मागोवा घेत भाजी बनवण्यापूर्वी मनात आलेले विचार आणि त्याप्रमाणे केलेली कृती तुमच्यासाठी.
एक म्हणजे भाजीचे दांडे दाताखाली यायला नको म्हणून मग भाजी मिक्सरला फिरवून घेतली. पूर्वी कुठे मिक्सर होते.. पण तेव्हा आजी हि भाजी कडकडीत उन्हात वाळवायची आणि मग हाताने चुरून ठेवायची.
त्याचवेळी यातील दांड्या ती काढून टाकत असे. आजची ही भाजी वाळलेली जरूर होती पण थोडी दमट होती; त्यामुळे हाताने चुरली जात नव्हती म्हणून मग मिक्सरला फिरवली.
दुसरे म्हणजे भाजी तिखट असायला हवी म्हणून हिरवी मिरची थोडी जास्त घेतली. भाजीला लसणाचा वास यायला हवा म्हणून नेहमी पेक्षा लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घेतल्या.
आता याच्या सोबत जिरे असले की फोडणीला मस्त खमंग वास येईल म्हणून मग एक चमचा जिरे घेतले आणि थोडे मीठ घालून मग ते मिक्सरला बारीक करून घेतले.
मग विचार आला... यात ओबडधोबड शेंगदाणे घातले तर...🙄 मग अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले. मग आठवले की भाजी मिळून येण्यासाठी आई त्यात थोडेसे डाळीचे पीठ घालायची, म्हणून मग एक चमचा डाळीचे पीठ घेतले.
चला, तयारी तर झाली. आता सगळं साहित्य तयार करून मस्त एक फोटो काढला... तुमच्यासाठी बरं..! 🙂 नक्की बघा.
हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी ©Suchitawadekar |
साहित्य :
• हरभऱ्यांच्या पानांची वाळलेली भाजी
• हिरवी मिरची
• लसूण
• जिरे
• शेंगदाणे
• डाळीचे पीठ
• मीठ
• तेल
कृती :
आता हि भाजी कशात करावी बरे..! म्हणजे कढईत करावी की कुकर मध्ये..🤔 कढईत केली तरी दहा-पंधरा मिनिटे तरी लागणार आणि कुकरला एका शिट्टीत होईल.
Gavran Menu : गावरान मेनू डाळ वांगं, मेथीची भाजी, मिरचीचा खरडा आणि भाकरी
शिवाय म्हणतात ना.. पालेभाज्या नेहमी झाकण ठेवून शिजवाव्यात.. मग कढईत केली काय अन कुकरमध्ये केली काय.. उलट कुकरमध्ये कमी वेळात होईल असा शुभच्छशिघ्रम विचार करत छोटा कुकर बाहेर काढला, जो खास भाजीसाठी यावर्षीच्या दिवाळीत माझ्या मोठ्या जाऊबाईंनी अगदी प्रेमाने दिला होता. त्याला बाहेर काढले अन शेगडीवर ठेवून दिले.
तेलही नेहमी पेक्षा थोडे जास्त घातले. त्यात लसूण, जिरे, मिरचीचे वाटणं, ओबडधोबड केलेले शेंगदाणे घालून परतले. मस्त खमंग वास आला. यात भाजी घालून थोडी परतून घेतली.
मग यात पाणी आणि डाळीचे पीठ घालून मस्त एक सारखी हलवून घेतली. पाणी मात्र सरभरीत होईल इतपत टाकयचं बरं..! फोटोत दाखवल्याप्रमाणे.. मग थोडे मीठ टाकून झाकण लावून एक शिट्टी घेतली.
पाच मिनिटात आपली हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची रसभरीत भाजी तैय्यार !! भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.. "हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी"
तुम्हीही करत असाल... काहींनी खूप दिवसांपूर्वी खाल्ली असेल. इकडे शहरात ओली हरभरा भाजी मिळते पण वाळलेली मिळत नाही.
थोडा चेंज म्हणून... मिळालीच तुम्हाला जर अशी भाजी तर नक्की करून बघा 🙂 आणि भाकरी... चपाती सोबत सर्व्ह करा.. 👍👍
• कशी वाटली रेसिपी..
• आवडली का..
• आवडल्यास जरूर शेअर करा पण माझ्या नावासहित..
• नाहीतर कॉपी राईट कायद्याचा भंग होईल.
धन्यवाद! 🙏🏻
© सौ. सुचिता वाडेकर...✍
0 टिप्पण्या