'नदीचे आत्मकथन'
"प्लास्टिकची काळी बाजू : प्रदूषण आणि विनाशातून नदीचा प्रवास"
प्लास्टिकच्या अति वापरामुळे आणि ते कुठेही फेकून देण्याच्या सवयीमुळे निर्माण झालेली अस्वछता व कालांतराने त्याचे उमटणारे पडसाद डोळ्यासमोर ठेवून आतातरी सर्वांनी जागरूक होऊन प्लास्टिकचा वापर टाळावा आणि हे कुणा एकट्याचे काम नसून आपण सर्वांनीच यासाठी पाऊल उचलले पाहिजे हे सुचवणारी माझी स्वलिखित कविता 'नदीचे आत्मकथन' आणि प्लास्टिकची काळी बाजू यावर प्रकाशझोत टाकणयाचा प्रयत्न केला आहे.
#कविता..
'नदीचे आत्मकथन'
आज अचानक नदी,
स्वप्नामध्ये बोलू लागली...
घाबरू नकोस फक्त,
ऐकून घे म्हणाली...!
काय या मानवाने,
केली माझी अवस्था...
बघावे तिकडे प्लास्टिक,
अन नुसता कचरा...!
उट सूट सारे,
नदीमध्ये गहाण टाकतात...
पर्यावरणाच्या नावाखाली,
माझी वाट लावतात...!
गाई, गुरे मग
तेच प्लास्टिक खातात..
मुक्या जनावरांचेही,
हाल होऊन जातात..!
पर्यावरणाचे धडे,
सारेच गिरावतात...
हिरीरीने विधानसभेत,
माझ्याविषयी बोलतात...!
नदीमध्ये भराव टाकून,
त्यावर बांधकाम करतात...
पुराचे पाणी घरात शिरले की,
डोक्याला हात लावून बसतात...!
बघावे तिकडे नुसती,
घाणच घाण..
नद्या, नाले केले,
प्लास्टिकने जाम..!
काय करावे या मानवाला,
शहाणपण केव्हा येईल...
नदीमध्ये कचरा टाकणे,
केव्हा बंद होईल...!
वाट मी पहाते आहे,
त्या दिवसाची...
जेव्हा स्वच्छ होतील,
पात्र नदीची...!
एकट्याचे ते काही काम नाही,
सार्यांनी मनावर घेतले पाहिजे..
पर्यावरणाची स्वछता राखणे,
अगदी जाणीवपूर्वक पाळली पाहिजे...!!
© सौ. सुचिता वाडेकर...✍
#लेख
"प्लास्टिकची काळी बाजू: प्रदूषण आणि विनाशातून नदीचा प्रवास"
प्लॅस्टिक प्रदूषण ही एक चिंताजनक जागतिक समस्या बनली आहे; ज्यामुळे आपल्या पर्यावरणाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या नाजूक परिसंस्थांना महत्त्वपूर्ण धोका निर्माण झाला आहे. अलिकडच्या वर्षांत, आपल्या नद्या या व्यापक दूषिततेच्या दुर्दैवी बळी ठरल्या आहेत.
आज, प्रदूषण आणि विनाश यातून नदीच्या प्रवाहात सापडणारा प्लास्टिकचा कचरा या अंधाऱ्या बाजूवर प्रकाश टाकण्याचा प्रयास मी करीत आहे. या लेखाच्या शेवटी, प्लास्टिकचा आपल्या नद्यांवर होणारा विनाशकारी परिणाम आणि बदलाची तातडीची गरज याविषयी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
• नदीचा प्रवास -
उंच पर्वतांच्या भव्य शिखरांवरून जन्मलेली नदी आपल्या प्रवासाची सुरुवात करत वाहत-वाहत हिरवळीच्या दर्यांमधून धाव घेते. दऱ्या कपाऱ्यांमधून मार्ग काढत आपला प्रवाह ती विस्तीर्ण मैदाने ओलांडत तिच्या अंतिम ध्येय्या पर्यंत म्हणजे महासागरा पर्यंत येऊन पोहोचते.
परंतु, दुर्दैवाने, प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे हा एकेकाळचा सुखद प्राचीन प्रवास मोठ्या प्रमाणात बदलला आहे. प्लॅस्टिक, एक टिकाऊ पण घातक सामग्री आहे जी आपल्या नद्यामध्ये शिरली आहे; ज्यामुळे त्यांच्या नाजूक परिसंस्थांना गंभीर हानी पोहोचते आहे.
• नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम -
नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम बहुआयामी आणि दूरगामी आहेत. प्लास्टिक कचऱ्याची भौतिक उपस्थिती नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करते, तिच्या वाहण्याला अडथळा निर्माण करते. मासे आणि उभयचर यांसारख्या जलचरांना या अडथळ्यांच्या मार्गांवरून प्रवास करणे कठीण होत आहे, ज्यामुळे त्यांच्या नैसर्गिक स्थलांतरण क्रियेला अडथळा निर्माण होतो.
शिवाय, प्लॅस्टिक प्रदूषणामुळे नदीच्या परिसंस्थेच्या पायाला म्हणजे वनस्पती आणि जीवजंतू जे तिला आपलं घर म्हणतात त्याला महत्त्वाचा धोका निर्माण झाला आहे. नदयांमध्ये अडकलेले हे प्लास्टिक कित्येक प्राणी चुकून खातात, ज्यामुळे त्यांना अंतर्गत जखमा होतात. त्यांच्या पचन संस्थेमध्ये अडथळे येतात आणि प्राण्यांचा मृत्यू देखील होतो. कित्येक प्राणी हा प्लास्टिकचा कचरा खाऊन मुत्यूमुखी पडले आहेत.
नदीच्या प्रवाहात अनेक जिवजंतू वास्तव्य करीत असतात जे सर्वस्वी नदीवर अवलंबून असतात. नदीच्या या जैवविविधतेचा नाजूक समतोल आणखी बिघडतो जेव्हा प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. साहजिकच जलचरांचा श्वास कोंडला जातो; त्यामुळे या जीवांच्या जीवनाच्या नाजूक जाळ्याला धोका निर्माण होतो.
शेवटी काय तर, नदीचा प्रवास प्लास्टिकच्या काळ्या बाजूने कलंकित झाला आहे. प्लॅस्टिक प्रदूषणामुळे नदीच्या परिसंस्थेचा नाश होत असताना एकेकाळचा शांत आणि नैसर्गिक प्रवाह विस्कळीत झाला आहे. यासाठी समाजात जागरुकता वाढवायला हवीय.
• उपाययोजना-
आपल्या नद्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांनी आपल्या जगात आणलेल्या विस्मयकारक सौंदर्याचे जतन करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला दंड आकारला जातो त्याऐवजी शासनाने या प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालायला हवी. उत्पादनच थांबले तर वापरही आपोआप थांबेल, पण हे केव्हा होईल माहीत नाही.
यासाठी समाजातील प्रत्येकाने जर स्वतःला सांगितले की पर्यावरणाची स्वछता राखणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, इथून पुढे असे विघटन न होणारे प्लास्टिक मी वापरणार नाही.. नाद्यांच्या प्रवाहात हा प्लस्टिकचा कचरा जाणार नाही याची मी काळजी घेईन तर मला वाटते आपल्या नद्या बऱ्याचशा प्लास्टिक मुक्त व्हायला मदत मिळेल. हे कुणा एकट्याचे काम नाही तर हे प्रत्येकाने मनाशी ठरवायला हवेय तरच हे शक्य आहे.
म्हणतात ना.. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी स्वतःपासून करायला हवी. मग आपणही आज सर्वजण एक प्रार्थना करूयात की आजपासून मी स्वतः हे प्लास्टिक नदी, नाल्यामध्ये टाकणार नाही, तसेच प्लास्टिक पिशव्या देखील मी वापरणार नाही. त्याऐवजी मी कागदी पिशव्यांचा वापर करेन ज्याचे विघटन होणे शक्य आहे.
कसे वाटले 'नदीचे आत्मकथन'.. तिचे दुःख समजले का..? एकाद्या निर्जीव वस्तूच्या जागी आपण स्वतःला ठेवून विचार केला तर त्या निर्जीव वस्तूचे मनोगत आपल्या लक्षात येते. 'नदीचे आत्मकथन' हा ही असाच हा एक प्रयत्न आहे कारण आपण इतरांना बदलवू शकत नाही परंतु स्वतःत मात्र निश्चित बदल करू शकतो.
• तुम्हाला काय वाटते..? मग तुम्हीही स्वतःपासून सुरुवात कराल ना..? तुमचं उत्तर 'हो' असेल तर ही कविता आणि त्यावरील लेख लिहिण्याचा माझा हेतू सफल झाला असे मी समजेन.
• कविता, लेख आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.
• कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
0 टिप्पण्या