आठवण महाराष्ट्रीयन 'व्हेज सात्विक थाळी' स्पर्धेची
#आठवण
#थाळी_स्पर्धा
काही वर्षापूर्वी एका रेसिपी ग्रुपवर एक थाळी स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेत मी "महाराष्ट्रीयन व्हेज सात्विक थाळी" बनवली होती. या स्पर्धेचा रिझल्ट 8 मार्च महिलादिन रोजी जाहीर केला गेला. या स्पर्धेत माझी "महाराष्ट्रीयन व्हेज सात्विक थाळी".. हि बक्षीसपात्र ठरली.
● या थाळीच्या जन्माची हि कहानी…
हि स्पर्धा 7 फेब्रु. गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजता सुरु झाली आणि 9 फेब्रु. शनिवार रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहणार होती. या स्पर्धेत स्वतः बनवलेल्या थाळी सादर करायच्या होत्या...
हि काँटेस्ट गुरुवारी सुरु झाली आणि शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहणार होती. शुक्रवार पर्यंत मी 3 थाळी पोस्ट टाकल्या होत्या... पण यातील 2 थाळी या आधीच्या थाळी होत्या... एक मात्र शुक्रवारी बनवलेली होती…
आधीच्याही थाळी चालतील असे मधुरा मॅमनी सांगितले होते.. तरी मनात कुठेतरी आपण स्पर्धेत भाग घेतोय असे वाटत नव्हते. शनिवारी सकाळी नऊ पर्यंत माझ्या मनात दुसरी नवीन पोस्ट टाकण्याचा कोणताही विचार नव्हता. साडेनऊच्या दरम्यान मनात विचार आला की आपण अजूनही थाळी बनवू शकतो... मग भराभर विचार येऊ लागले.
कमीवेळात सात्विक थाळी ज्यात गोड, कडू, तिखट, आंबट चव तसेच कडधान्य, फळभाजीचा समावेश असेल अशी थाळी आपण बनवू शकतो का...? मी प्रथम लिस्ट तयार करायला घेतली... घरात काय काय भाज्या आहेत त्यानुसार थाळीत कोणते कोणते पदार्थ ठेवायचे, जे मी कमी वेळात बनवून वेळेत थाळी सादर करू शकेन.
मी लिस्ट तयार केली... बटाटे, कारले, गाजर, पनीर, दही, हळदीचे लोणचे, शेंगदाणा चटणी, बाजरी पीठ हे सर्व घरी होते. बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी.. वर गुळ व त्यावर तूप.. मस्त👍 आणि पोळी ऐवजी फुलके करूयात... कसे...! आता झटपट होणारे एखादे कडधान्य...? मटकी डोळ्यापुढे आली. सुकी भाजी झटपट कोणती होईल...? लगेच बटाट्याची पिवळी भाजी डोळ्यासमोर आली.
My Mother in law : माझ्या सासूबाई
लेकीला सुट्टी होती... ती जवळच होती. लगेच तिने पनीरची भाजी पाहिजेच असा हट्ट धरला. ठीक आहे... पनीर आहे घरी असे म्हणून मीही दूजोरा दिला. आता स्वीट बनवायला तेवढा वेळ नव्हता... लगेच चितळे बंधू धावून आल. आता पापड राहिले... पापड घरात होते फक्त फ्राय करावे लागणार होते पण लगेच विचार आला पापड हा कॉमन झाला, पापडाऐवजी आपण दुसरे काय ठेऊ शकतो का...? मध्यन्तरी मुलांच्या भोंडल्याच्या वेळी पापडी चॅट ठेवला होता... म्हटले चला आज थाळीत पापडीचॅट ठेऊयात... मुलगीही खुश झाली.
● आता माझी फायनल यादी तयार झाली.
● वरण-भात
● गाजर कोशिंबीर
● मीठ, लिंबू
● हळदीचे लोणचे
● पापडी चॅट
● फोडणीचे वरण
● बटाटा भाजी
● डाळ कारले
● बटर पनीर मसाला
● मटकी उसळ
● फुलके
● बाजरीची भाकरी, गुळ, तूप
● दही
● श्रीखंड (चितळे)
यानुसार बाहेरून आणाव्या लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली. बरोबर 9:30 वाजले होते. माझ्या डोक्यात वेळेचे गणित सुरु झाले... माझं सगळं आवरून निघेपर्यंत एक तास लागणार होता. म्हणजे निघायला 10:30... बाहेरून सामान आणण्यासाठी माझ्याकडे फक्त अर्धा तास होता. कसल्याही परिस्थितीत मला 11 वाजता घरी यायला हवे होते. 11 ते 1 हे दोन तास मला स्वयंपाकाला पुरेसे होते... म्हणजे 2 तासात स्वयंपाक होईल असाच मेनू मी ठरवला होता. बरोबर 1 वाजता थाळी रेडी करून फोटो काढून पोस्ट लिहायला साधारणतः अर्धा तास... म्हणजे कसल्याही परिस्थितीत 1:30 वाजता पोस्ट टाकायलाच हवी होती.
हे सगळं लिस्ट करत असताना मी बोलत होते.. हे सगळं माझ्या लेकीचे बाबा नाष्टा करत असताना पहात होते आणि ऐकत होते. इतक्यात ते म्हणाले की इतक्या कमी वेळात एवढं सगळं बनवणं अशक्य आहे.. तू नाद सोड. म्हटलं, "काय म्हणालात..... अशक्य... ?" आता तुम्ही बरोबर एक वाजता या. या लिस्टप्रमाणे थाळी रेडी असेल असे म्हणून मी माझ्या कामाला लागले. नंतर मी माझी नव्हतेचमुळी.
ठरल्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या... साडेदहा ते अकरा खरेदी... 11 ते 1 स्वयंपाक. एका कुकरला वरण-भात, एका कुकरला बटाटे लावले. पटकन कारल्याच्या चकत्या करून उकळत्या पाण्यात उकळायला ठेवल्या... तोपर्यंत बटाटा भाजी, मटकी, कारले यासाठी कांदा चिरून घेतला. टोमॅटो चिरला, बटाटा भाजीचे वाटण करून ठेवले, तोपर्यंत कुकर झाले. बटाटे चाळणीवर निथळायला ठेवले आणि तो कुकर धुऊन त्यामध्ये मटकीची भाजी बनवली.
आता लेकीची लुडबुड आणि त्रास सुरू झाला... आमच्याकडे नवीन काही पदार्थ करणार असे नुसते समजले तरी प्रचंड भूक लागते... मग तो पदार्थ तयार होई पर्यंत वेळ काढणं कठीण जातं. मधून मधून सारखं चालू असतं... "झालं का.. झालं का ..?" अरे यार.. अजून कितीवेळ लागणार आहे. नुसती भुन भुन सुरु होते आणि याचा मला खूप त्रास होतो. तरी बरं लेकीचे बाबा घरी नव्हते. मग लेकीला थोडे आमिष देऊन खाली सायकल चालवायला पिटाळले. सांगितले, अर्ध्या तासाने ये आणि मी कामाला लागले.
दुसऱ्या गॅसवर कढईत डाळ कारले बनवले. एक शिट्टी झाली की मटकीचा गॅस बंद केला आणि त्यावर बटाटा भाजी बनवली. आता राहिली पनिरची भाजी. पटकन एका पातेल्यात थोडे पाणी ठेऊन त्यात कांदा, खडा मसाला आणि काजू उकळायला ठेवले. एक पाच मिनिटांनी ते मिक्सरला फिरवले, टोम्याटोची प्युरी केली. एकीकडे पनीर क्युब उकळत्या पाण्यात घातले, दुसरीकडे कढईत कांदा, काजू, टोमॅटोचे वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतले. उकळत्या पाण्यातील पनीर घालून तिखट मीठ घालून भाजी बनवली.
My first Scooty Sawarii : माझी पहिली स्कुटी वारी
साडेबारा झाले आणि इंटरकॉम वरून लेकीचा फोन आला... " आई, साडेबारा झाले.. येऊ का ..?" मी तिला ये म्हटले. आता पापडी चॅट, वरणाला फोडणी, फुलके आणि बाजरी भाकरी राहिल्या होत्या. सगळं आवाक्यात होतं इतक्यात माझी मुलगी आली... "अजून नाही झालं... ?" झालं एक थोडावेळ... पापडी चॅट, भाकरी आणि फुलके राहिलेत. मी असे म्हणताच लेक म्हणाली, "मम्मा, मी बनवू पापडी चॅट ...? तोपर्यंत तू तुझ्या भाकरी बनव. " मी म्हटलं ठीक आहे. तिला सगळं साहित्य काढून दिले आणि मी माझ्या कामाला लागले. बरोबर 1 वाजता सर्व रेडी झाले... अगदी गॅस, ओटा सगळं व्यवस्थित आवरून. स्वयंपाक तयार झाला की मला ओटा स्वच्छ लागतो म्हणजे ती माझी सवय आहे.
मला एखादया live contest चा फील येत होता. तुम्हाला आठवत... पूर्वी टीव्ही वर मास्टर शेफ काँटेस्ट दाखवली जायची... त्यात भाजी खरेदीसाठी आणि प्रत्यक्ष रेसिपी बनवण्यासाठी वेळ दिला जायचा. अद्यावत किचन... सर्व साहित्य... लागणारी भांडी... घड्याळाची टिक टिक... स्पर्धकांची तारांबळ... आणि जज... असे ते दृश्य असायचे. मध्येच लुडबुड करणारे निवेदक... सेम फील मी त्यादिवशी अनुभवला. मीच मला time दिला होता, माझे किचन याचा साक्षीदार होते. घड्याळाची टिक टिक कानात घुमत होती. जज खादाड खाऊ होते आणि लुडबुड करणाऱ्या निवेदकाचे काम माझी मुलगी बजावत होती. हुशश... झाले सर्व एकदाचे 👍
आता फक्त थाळी भरणे बाकी होते.. तेही वेळेत झाले. खादाड खाऊ जजसाठी पटापट फोटो काढले अन देवाला थाळीचा नैवैद्य दाखवला. तोपर्यंत मुलीने बाबांना फोन करून थाळी रेडी असल्याचे सांगितले. मग मी ती थाळी उचलली आणि लेकी समोर ठेवली व सांगितले की यातले तुला जे हवे ते खा पण अर्धा तास मला त्रास देऊ नकोस. पडत्याफळाची आज्ञा मानून तिने तिचे कामला सुरुवात केली. मग मी पोस्ट लिहिली आणि ग्रुपवर टाकली. तोपर्यंत 1:45 झाले होते.
Maharashtrian Veg Satvik Thali |
मधुरा मॅम ऑनलाइन दिसत नव्हत्या... जॅम टेन्शन येऊ लागले... 15 च मिनिटे शिल्लक होती. या 15 मिनिटात पोस्ट approval नाही झाली तर...? माझ्या मनाचा निगेटिव्ह विचार ताबा घेऊ लागले. मी मधुरा मॅम ना मेसेज केला... एक दहा मिनिटांच्या आत त्यांचा मेसेज आला... मी पाहिलं तर माझी पोस्ट approval झाली होती. 🤗
Letter to God : प्रभूस पत्र...
हुश्श ! किती हायसं वाटलं म्हणून सांगू...!
या स्पर्धेमुळे प्रत्यक्ष स्पर्धेचा फील आला 😁 आणि विजेत्यांच्या थाळी मध्ये माझी थाळी पाहून श्रम सार्थकी लागले... याचा विशेष खूप आनंद झाला . 😊😊
• कशी वाटली ऑनलाईन थाळी स्पर्धा..
© सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️
0 टिप्पण्या