Letter for mother in law : " एक पत्र 'ती' च्यासाठी" |
"एक पत्र 'ती' च्यासाठी"
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
नमस्कार! 🙏🏻
मागच्या वर्षी स्टोरी टेलने घेतलेल्या "एक पत्र 'ती' च्यासाठी" या उपक्रमात माझ्या सासूबाईंना 11 मे 2014 रोजी लिहिलेले माझे पत्र सिलेक्ट झाले. आज ते पत्र मी तुमच्या सोबत शेअर करतेय याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझ्या सासूबाई हयात नाहीत परंतु तुम्ही ते पत्र वाचताना त्या जिथे कुठे असतील तिथे नक्कीच सुखवतील याची खात्री आहे.
"जीने आई म्हणून मला समृद्ध केल ती माझी मुलगी आणि माझ्या तीन आई" (आई, सासुबाई आणि काकू) यांच्या विषयीचे विचार व्यक्त करीत आहे.
Family is most important in our life : बंध नात्यांचे....
यावर्षी एप्रिलमध्ये माझ्या लेकीला चौदा वर्षे पूर्ण झाली. हि 14 वर्ष किती भूर्कन गेली कळले देखील नाही. आज मागे वळून पाहताना वाटतं की इवलसं माझं पिलू किती पटकन मोठं झालं, आता तर एवढंसं होतं, पण काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं.
तिचं पहिल्यांदा हसणं, पहिल्यांदा पालतं होणं, रांगणं, पहिल्यांदा बोलणं, तिने 'आई' म्हणून मारलेली पाहिली हाक.. ज्यासाठी कान अगदी आतूर झाले होते. तिने टाकलेलं पहिलं पाऊल, तिला आलेला पहिला दात, तिचं पहिल्यांदा शाळेत जाणं, ती अजारी असताना रात्र - रात्र तिच्या उशाशी बसून जागणं, थोड्या थोड्यावेळाने थर्मामीटर ने ताप चेक करणं, गार पाण्याने अंग पुसून घेणं, कधी ती न जेवताच झोपली तर जीवाची होणारी 'उलघाल, झोपेतून उठून 'आई अशी मारलेली हाक ऐकून नकळत तिच्याकडे वळणारी माझी पावले हे सगळं डोळ्यासमोरून गेलं.
या दिवसात मी माझी नव्हतेच मुळी, माझं सर्व विश्व तिने व्यापलं होतं. पण खरं सांगू, या काळात खऱ्या अर्थाने समृद्ध झाले मी. आई म्हणजे नक्की काय? कशी असते आई? आईच्या मनात नेमक्या काय भावना असतात आपल्या पिला विषयी ? या माझ्या मनातील प्रश्नांना पूर्णविराम मिळान होता. आईची खऱ्या अर्थाने ओळख झाली मला आणि नव्याने उमगल्या त्या माझ्या 'सासूबाई' ते याच काळात.
सासू-सूनांमधला वाद, मौन, अढी कुठल्याकुठे पळून गेली. आपण जे आपल्या पिला साठी करतोय ते 'सर्व', काही वर्षांपूर्वी आपल्या आईने आपल्यासाठी आणि सासुबाईंनी आपल्या 'नवन्यासाठी' केलंय याची जाणीव झाली. माझातील ''आई' माझ्या आईतील 'आई' आणि माझ्या सासुबाईमधील 'आई' हि वेगळी नसून एकच आहे हे कळले आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदालला माझा.
माझ्याही नकळत मी त्यांना समजून घ्यायला लागले. का कोण जाणे पण माझ्यात झालेला हा बदल मला सतत अस्वस्थ करायचा, मनात असंख्य विचार यायचे; शेवटी त्या विचारांना आणि भावनांना पत्र रुपाने वाट मोकळी करून दिली.
समाधान एका गोष्टीचं वाटतं की त्यांची मानसीक स्थिती चांगली असताना त्यांच्या विषयी वाटणाऱ्या माझ्या मनातील भावना मी त्यांच्यापर्यंत पोहचवू शकले याचे. आई गेल्यानंतर त्यांच्या रूममधील सामान हलवताना त्यांच्या उशाशी गादीखाली त्यांना लिहिलेल हे माझं पत्र सापडलं. त्यांनी ते त्यांच्या उशाजवळ अजूनपर्यंत जपून ठेवलेलं पाहून डोळे भरून आले आणि मन भूतकाळात गेले.
हे पत्र वाचल्यावर त्यांना खूप आनंद आणि समाधान मिळाले होते. त्यांना भेटायला जो कोणी येईल त्याच्याकडून त्या हे पत्र मोठ्याने वाचून घ्यायच्या. घरातील सर्वाकडून वाचून घेतले शिवाय माझ्याकडूनही दोन - तीन वेळा वाचून घेतले आणि पत्र लेखनाचा 'उत्तम नमूना'असा शेराही दिला होता. त्यावेळी त्यांना झालेला आनंद आणि समाधान त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचे ते पाहून माझेही मन सुखावले होते.
या पत्रामुळे माझ्या सासुबाईंना मिळालेला आनंद तुमच्याशी शेअर करतीये. माझ्या दृष्टीने हे पत्र तुमच्याशी शेअर करणे म्हणजे त्यांना वाहिलेली आदरांजलीच आहे.
मागच्या वर्षी स्टोरी टेल ने जागतिक महिला दिनानिमित्त "एक पत्र 'ती' च्यासाठी" हा पत्र लेखन उपक्रम घेतला होता त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर 'माझ्या सासुबाई' आणि त्या हयात असताना त्यांना लीहीलेल माझं 'पत्र' डोळ्यासमोर उभं राहील. स्टोरी टेल ने घेतलेल्या या उपक्रमात माझे हे पत्र सिलेक्ट झाले.
My Mother in law : माझ्या सासूबाई
आज ते पत्र मी तुमच्या सोबत शेअर करतेय याचा मला निश्चितच आनंद आहे.. ⤵️
"एक पत्र 'ती' च्यासाठी"
ति. सौ. आईंस, (सासुबाई)
सौ. सुचिताचा सा. नमस्कार.
सर्वप्रथम महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! खरे तर फोन करूनही शुभेच्छा देता आल्या असत्या. परंतु माझ्या मनात तुमच्या विषयी असलेल्या भावना फोन पेक्षा पत्रा ने तुमच्या पर्यंत पोहोचवाव्यात असे वाटल्याने हे पत्र लिहीत आहे. तुम्ही जन्म दिला नसलात तरी लग्नापासून मी तुम्हाला आई म्हणत आली आहे; परंतु तुमच्यातील आई ओळखायल किंवा तिचं प्रेम अनुभवायला १४-१५ वर्षे जावी लागली.
आर्या आमच्या आयुष्यात येण्याआधी एक प्रश्न माला पडला होता. आई म्हणजे नक्की काय? आईच्या मनात आपल्या मुलांविषयी नेमक्या काय भावना असतात? मला जमेल का हे सारे? मी जरा सांशकच होते. परंतु आर्या आमच्या आयुष्यात आली आणि कित्येक गोष्टी हळू-हळू उलगडत गेल्या, नव्याने समजल्या आणि खऱ्या अर्थाने समजली ती 'आई'
Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?
अजारी पडल्यावर रात्र-रात्र जागणारी ती 'आई', स्वतःच्या तोंडचा घास काढून स्वतःच्या मुलांना देणारी ती 'आई', जिच्या मनात सदैव स्वतःच्या मुलांचाच विचार असतो ती 'आई'. अशा कितीतरी गोष्टी जाणवल्या. आई म्हणजे 'ममता', आई म्हणजे 'प्रेम', आई म्हणजे 'वात्सल्य', आई म्हणजे 'विश्व' आई म्हणजे 'सागर' हे सगळं वाचलं होतं आणि वाचण्यापुरतंच मर्यादित होतं. वास्तवात याचा कधी विचारही केला नव्हता. किंबहुना त्यादृष्टीने पाहण्याचा प्रयत्नही केन नव्हता.
आर्या आल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी जागवल्या आणि खऱ्या अर्थाने समजली ती म्हणजे 'आई', मग ती जन्म देणारी असो किंवा तिच्या इतकीच महत्त्वाची माझी दुसरी आई म्हणजे 'माझी काकू' असो किंवा ज्यांना लग्नानंतर मी आई मानते त्या 'माझ्या सासुबाई' म्हणजे अर्थात तुम्ही असो. माझ्या आयुष्यात माझ्या या तीन आईंना खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि इथून पुढेही ते राहील यात शंका नाही.
गेल्या ३-४ वर्षामध्ये माझा तुमच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात अमुलाग्रह बदल झाल आहे. तुम्ही मला नव्याने उमगलात. मी एक आई आहे आणि एक आई म्हणून तुम्ही तिघी मला खूप जवळच्या वाटता. आज या महिला दिना निमित्त तुमच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली म्हणून हे पत्र लिहीत आहे. त्या दोघींनाही लिहीलंय. काकूला मी माझी दुसरी आई मानते, कारण तिने मला दोन वर्ष स्वतःच्या मुली प्रमाणे सांभाळलंय हे मी कधीही विसरू शकत नाही.
गेल्या १७ वर्षात तुमच्याकडून बरंच काही शिकले मी. सुरुवातीला आपल्यामध्ये बरेच वाद व्हायचे, वैचारीक मतभेद व्हायचे. आता आठवलं की वाटत की किती बालीश होतो आपण, थोडीही प्रगल्भता नव्हती याचं वाईट वाटतं. पण असो. चुकल्या शिवायही शहाणपण येत नाही असे म्हणतात ते अगदी खरे आहे हे पटते.
तुम्ही तुमच्या चारही मुलांना चांगले शिक्षण दिलेत, त्यांच्यावर चांगले संस्कार केलेत, त्यांना स्वावलंबी बनवलत व आयुष्यामध्ये एक चांगला माणूस बनण्यास प्रेरित केलंत त्याबद्दल Thanks!
त्याकाळी पगार खूप कमी होते, आण्णा एकटे कमावणारे, चार मुलं, त्यांचा शिक्षणाचा, पालन-पोषणाचा खर्च, हे सर्व भागवणं म्हणजे तारेवरची कसरतच असेल, पण तरीही तुम्ही ते योग्यरितीने करत घर ही बांधलत आणि आण्णांना हे शक्य झालं केवळ तुमच्या साथीमुळे तुम्ही त्यांना साथ दिली नसती तर शक्य नव्हतं.
आम्ही या घरात आले तेव्हा आम्हाला हे सर्व आयतं मिळालं. तुम्ही मात्र यासाठी खूप कष्ट घेतलेत त्याबद्दल Thanks !
मुलांना चांगले संस्कार दिलेत त्यांना चांगल्या सवयी लावल्यात, त्यांच्यामध्ये काहीतरी मिळविण्याची, करण्याची जिद्द निर्माण केलीत त्याबद्दल Thanks!
तुमच्यातल्या आईने स्वतःचं मन मारून सतत मुलांचा, घराचा विचार केला त्याबद्दल Thanks!
आज तुमची मुलं किंवा आर्याचे बाबा जे काही आहेत ते केवळ तुमच्या संस्कारांचे फलीत आहे त्याबद्दढ Thanks!
या सर्व भावना गेल्या चार वर्षांमधील आहेत. मी स्वतः आई झाल्यावर एक आई म्हणून माला समजलेल्या. त्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या होत्या. आज या पत्राद्वारे त्या मी तुमच्यापर्यंत पोहचवीत आहे.
Letter for daughter from mother : लेकीस पत्र..
खरंच, एका आईनं जन्म दिला, वाढवलं, दुसऱ्या आईनं मला घडवण्यात खारीचा वाटा उचलला आणि तिसऱ्या आईन माझ्या आयुष्याला दिशा दिली. त्याबद्दल धन्यवाद !
Thank you Aai.
तुमची,
सौ. सुचिता
11.05.2014• कसे वाटले पत्र..
• आवडले का..
• तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
• पत्र आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.
• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️
0 टिप्पण्या