'पातळ पोह्यांचा चिवडा'
#Snacks
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
सर्वांना आवडणारा हा चिवडा गौरी-गणपती, दिवाळी तसेच एरवीही उन्हाळ्यात केला जातो. उन्हाळ्यात पोहे उन्हात चांगले वाळवून घ्यावेत म्हणजे चिवडा कुरकुरीत होतो. उन्हात वळवलेले पोहे पुन्हा भाजून घ्यायची गरज नसते.
एरवी मात्र पोहे भाजून चिवडा बनवताना पोहे भाजण्यासाठी आणि चिवडा कुरकुरीत होईपर्यंत हलविण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. ती घेतली आणि खाली दिलेल्या टिप्सचा वापर केलात तर तुमचा चिवडा कधीही नरम पडणार नाही.
खालील प्रमाणात केलात तर दहा ते बारा लोकांना आरामात पुरतो.
'पातळ पोह्यांचा चिवडा'
• साहित्य :
• पातळ पोहे - अर्धा किलो
• पंढरपुरी डाळे - दीड वाटी
• शेंगदाणे - १ वाटी
• काजू - १ वाटी
• खोबरे काप - १ वाटी
• जिरे - १ चमचा
• तीळ - २ चमचे
• हिंग - अर्धा चमचा
• हळद - दीड चमचा
• कढीपत्ता - १ वाटी
• हिरवी मिरची - ६ - ७
• पिठीसाखर -अर्धी वाटी
• मीठ - २ चमचे
• तेल - १ वाटी
• कृती :
१. प्रथम पोहे चाळणीने चाळून घ्यावेत.
२. यानंतर एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ एकत्र करून एका वाटीत घ्यावेत.
३. यानंतर जिरे आणि तीळ मिक्सरला ओबड-धोबड करून घ्यावे.
४. यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून अथवा मिक्सरला फिरवून घ्यावी.
५. या नंतर पोहे गॅसवर एका मोठ्या कढईत थोडे थोडे भाजून घ्यावेत.
६. हे भाजलेले पोहे एका मोठ्या परातीत काढून घ्यावेत.
७. आता या पोह्यांवर डाळे पसरून घ्यावेत आणि त्यावर हळद मिठाचे केलेले मिश्रण थोडे थोडे भुरभरून घ्यावे.
८. या नंतर कढईत तेल घालून शेंगदाणे, काजू, खोबरा काप तळून घ्यावेत व ते परातीतील पोह्यांवर घालावेत.
९. आता पुन्हा यावर उरलेले हळद मिठाचे मिश्रण भुरभूरावे.
१०. कढीपत्ता तळून तोही पोह्यांवर घालावा आणि परातीतील पोहे एकत्र करावेत.
Gupit : गुपित (लघुकथा) - काही गोष्टी गुपित ठेवणं हे सगळ्यांच्याच हिताचं असतं
११. आता उरलेल्या तेलात हिंग, हळद, वाटलेले जिरे-तीळ आणि मिरचीचे काप घालून फोडणी करावी आणि या फोडणीत परातीतील पोहे घालून मिक्स करावे.
१२. गॅस बारीक ठेवावा व पोहे कुरकुरीत होईपर्यंत हलवत रहावे.
१३. पाच ते सात मिनिटात पोहे कुरकुरीत झाले की गॅस बंद करावा व वरून पिठीसाखर घालून एकसारखे हलवून घ्यावे.
१४. आता थंड होण्यासाठी चिवडा पेपर वर काढून घ्यावा व थंड झाल्यावर यामध्ये पाव किलो शेव मिक्स करावी.
१५. आपला पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा तैयार !
टीप : १. चिवडा डब्यात भरताना झाकणा मध्ये कागद घालावा म्हणजे चिवडा नरम पडत नाही.
२. शेव घातल्याने चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहतो.
३. पिठीसाखर नेहमी गॅस बंद केल्यावर चिवड्या मध्ये घालावी आधी घातली तर ती जळण्याची शक्यता असते.
४. कढई छोटी असेल तर दोन वेळा फोडणी करावी व त्यानुसार तेलाचे प्रमाण ठरवावे.
My favorite fruit : Mango माझं आवडतं फळ 'आंबा'
• कशी वाटली रेसिपी आवडली का..
• मग तुम्हीही बनवणार नां..
• बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.
• रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
0 टिप्पण्या