"क्षमा"
क्षमा दोन अक्षरी शब्द पण त्यात खुप ताकद आहे. क्षमा मागणं जितकं अवघड तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त अवघड आहे क्षमा करणं. हे सहजासहजी कोणाला जमत नाही.. म्हणून तर अनेक नात्यांमध्ये दरी पडलेली दिसून येते.
सासू सुनेचे नाते हे देखील यापैकीच एक आहे. बऱ्याचदा सासू तरी वाईट असते किंवा सून तरी वाईट असते. पण क्षमा या धाग्याने दोघी एकदुसरीशी जोडल्या गेल्या तर.. घराघरातील कलहच संपून जातील आणि सुखी आनंदी कुटूंब पहायला मिळतील. यासाठी एक उदाहरण आपण पाहुयात..
सुनेच्या नजरेतून..
सून हि सूनच असते... सून कधी मुलगी होऊ शकत नाही... अशी वाक्ये जेव्हा कानावर पडतात त्यावेळी मन खूप विषन्न होते. खरंच सून एवढी वाईट असते का हो? सगळ्या गोष्टी सुनेच्याच चुकतात का?
खरे तर ती आपलं स्वतःचं घर सोडून सासरी आलेली असते. तिला आपलं घर तिचं स्वतःचं घर वाटावं यासाठी किती सासू-सासरे प्रयत्न करतात बरे... नक्की सांगा, सुरुवात कोणापासून होते बरे?
नाण्याला दोन बाजू असतात पण एकावेळी आपल्याला एकच बाजू दिसते याचा अर्थ दुसरी बाजू नसतेच असे नाही ना होत.
Positive Self Dialog : 'सकारात्मक स्व:संवाद' जेव्हा तुम्ही स्वतःशी सकारात्मक संवाद साधता तेव्हा येणाऱ्या कठीण परिस्थितीवर नक्की मात करू शकता.
खरं तर सून घरात आल्यावर सासू-सासऱ्यांकडून सुरुवातीला झालेल्या चुकाच सुनेला लेक बनण्यापासून रोकतात... मग असं असताना प्रयेकवेळी सुनेलाच का जबाबदार धरले जाते?
सासू-सासरे सुनेला का नाही लेकी सारखे प्रेम देऊ शकत? सून सुद्धा तुमच्या मुलीसारखीच आहे... सुनेने लेकीसारखे वागण्यासाठी आधी सुनेला लेकीचा दर्जा तर द्यायला हवा ना.
आपली लेक चुकीचं वागली तर तिची बाजू घेऊन सारवासारव करायची... आणि सूनेला मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं... असं दुटप्पी वागणं बरोबर आहे का? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं का बरं?
Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-११) "प्रौढावस्था" (मध्यप्रौढावस्था) - कालावधी : ४० वर्षे ते ६० वर्षे पर्यंत
मान्य आहे की सून घरात आली की सासूला इनसिक्युअर वाटू लागतं; पण सासूच्या इनसिक्युअरचा त्रास सुनेने का झेलायचा…? यात तिची काय चूक?
खरं तर सासु-सासऱ्यांच्या अशा वागण्याने सुनेची अवस्था 'धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का' अशी होताना दिसते... मग तीही हतबल होऊन तिला जमेल तसा प्रतिकार करू लागते.
अशावेळी 'सून हि सूनच असते... सून कधी मुलगी होऊ शकत नाही' असे टोमणे मारून आपण सुनेपासून आणखी दूर जात आहोत हे सासु-सासऱ्यांच्या लक्षात येत नाही याचे खूप आश्चर्य वाटते.
लेकीला स्वतःच्या घराजवळ फ्लॅट घेऊन द्यायचा आणि सुनेने मात्र वेगळं रहायचं नाही. तिने मात्र सासुसासऱ्यांची सेवा करायची आणि त्यातूनही एखादी सून राहिलीच वेगळी तर तिच्या नावाने खडी फोडायची. मग अशावेळी स्वतःच्या मुलाला बैल म्हणयलाही कमी करत नाहीत हि मंडळी; पण खरंच हे वागणं बरोबर आहे?
सासूच्या नजरेतून..
हल्लीच्या सासवा सुनांना ना थोडया घाबरूनच असतात. त्यात नोकरी करणारी सून असेल तर काही विचारूच नका. सगळ्या गोष्टी तिच्या मर्जीनुसार चालतात. नाही म्हणायला सुरुवातीची काही वर्षे शांत असलेल्या ह्या सुना नंतर मात्र घराचा ताबा घेतात आणि मग त्यांचीच मर्जी चालते.
सासू-सून म्हणजे नाण्याच्या दोन बाजू. तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना. थोडक्यात काय तर सून सासू-सासऱ्यांना दोष देते आणि सासू-सासरे सुनेला दोष देत असतात. 'घरो घरी मातीच्या चुली' पिक्चर बघितला असेल तुम्ही.
Positive Mind : "आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार"
मला वाटते की सतत एकमेकांना दोषी ठरवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार केला की निम्मे काम इथेच होते. चुका काय प्रत्येकाकडून होत असतात पण त्याचा स्वीकार करून त्या पूर्ण पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली तरी उरलेली अर्धी लढाई सहज जिंकता येणं शक्य आहे.
यासाठी प्रत्येकाने स्वतःकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या नात्याची स्पेस जपता आली पाहिजे. एकमेकांच्या आयुष्यात केव्हा आणि किती लक्ष घालायचे हे प्रत्येकाला ठरवता आले पाहिजे आणि हे जर प्रत्येक घरातील वरिष्ठांनी मनावर घेतले तर सहज शक्य आहे.
समोरच्याकडून अपेक्षा करण्याआधी एक पाऊल मागे येऊन प्रेमाचा हात पुढे केलात तर गोष्टी एवढ्या थराला जाणार नाहीत याची खात्री आहे.
चुका कोणाकडून होत नाहीत... प्रत्येकाकडून होतात पण ती चूक का घडली? नेमकं असं काय घडलं की ती चूक करण्यास समोरची व्यक्ती धजावली... हा शोध प्रत्येकाला घेता आला पाहिजे.
चूक करणाऱ्या व्यक्तीला समजून घेऊन मोठ्या मनाने माफ करता आले पाहिजे... क्षमा करता आली पाहिजे.
"क्षमा हि खूप मोठी शक्ती आहे".... याची खरी ताकद आजमावयाची असेल तर पहा क्षमा करून... अजूनही वेळ गेलेली नाहीये. बाजू पलटवनं तुमच्या हातात आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी गोष्ट नक्की घडलेली असते की जीची बोचणी आत मनामध्ये कुठेतरी असते... तिची आठवण जेव्हा जेव्हा येते त्यावेळी त्या व्यक्तीचा राग तर येतोच शिवाय मानसिक त्रासही होतो तो वेगळाच. अशावेळी त्या व्यक्तीला जाणीवपूर्वक मनापासून क्षमा करन पहा... चित्र नक्की बदलेल.
चुका उगाळत बसण्यापेक्षा झालेली चूक मान्य करून तशी चूक पुन्हा न करण्याचा निश्चय केला आणि समोरच्याला क्षमा केली तर कित्येक संसार वाचतील, फुलतील, बहरतील याची खात्री आहे.
स्वतःचा संसार स्वतःच्या मर्जी नुसार केला आता मुलांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे निर्णय घेऊ देत हा सारासार विचार जर प्रत्येकाने केला तर वादाचा मुद्दाच मुळी उरणार नाही.
प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणे थांबवले आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारूनच केली पाहिजे हा अट्टाहास सोडला तर अनेक घरात आनंद नांदेल.
विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, कुठे दुर्लक्ष करायचा हे ज्याला जमेल तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.
कोण चूक, कोण बरोबर या वादात पडण्यापेक्षा आपले तर कुठे चुकत नाहीना... याचा शोध प्रत्येकाला घेता आला पाहिजे... मग ते सासू-सासरे असोत, सून असो, मुलगा असो वा मुलगी.
क्षमा मागणं खूप सोपं असतं पण क्षमा करणं खूप अवघड आहे. विशेषतः आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला क्षमा करणे खूप अवघड जाते. आपल्याला वाटते की आपण क्षमा केलीय पण प्रत्यक्षात तसे होत नाही. त्या व्यक्तीला पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दलचा राग उफाळून येतो; पण मनापासून प्रयत्न केले तर शक्य होते.
स्वतःचे चुकले असेल तर माफीही मागता आली पाहिजे आणि समोरच्याचे चुकले असेल तर त्याला मोठ्या मनाने माफ देखील करता आले पाहिजे. हे ज्याला समजले त्याची लॉटरी लागली म्हणून समजा.
बघा प्रयत्न करून पटतंय का... हातच्या काकनाला आरसा कशाला? सुरुवात स्वतः पासून करायचीय... तयार आहात तर!
Your time is start now....! 👍
धन्यवाद!
©सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
◆ विनंती : सगळेच सास-ुसासरे असे असतात असे नाही... तरी कृपया कोणीही वाईट वाटून घेऊ नये... कोणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नाहीये.
● प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे हा या लेखाचा उद्देश आहे. कोणाची मने दुखावली गेल्यास क्षमस्व! 🙏
● लेख आवडल्यास नावसाहित शेअर करावा आणि कॉपी पेस्ट केल्यास नावसाहित करावा...अन्यथा कॉपी राईट कायद्याचा भंग होईल... धन्यवाद! 🙏
0 टिप्पण्या